अँटिग्वा। सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने पहिल्या डावात 17 षटके गोलंदाजी करताना 43 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
यावेळी गोलंदाजी करताना त्याला जसप्रीत बुमराहने चेंडू क्रॉस सीम करण्यास सांगितले होते. त्यामुळे गोलंदाजी करताना मदत झाल्याचे इशांतने क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. ही मुलाखत बीसीसीआयने अधिकृत वेबसाईटवर शेअर केली आहे.
इशांत त्याच्या गोलंदाजीविषयी म्हणाला, ‘त्यावेळी पाऊस पडला होता. चेंडू ओला झाला होता आणि त्यामुळे काही मदत होत नव्हती. म्हणून आम्ही क्रॉस सीम गोलंदाजी करण्याचा विचार केला. खेळपट्टीवर बाऊन्स होता. खरंतर बुमराहने मला सांगितले की खेळपट्टीवर गोलंदाजीत काही होत नसल्याने आपण क्रॉस सीम करण्याचा प्रयत्न करु शकतो.’
‘प्रयत्न एवढाच होता की जेवढे लवकर प्रतिस्पर्धी संघाला बाद करता येईल तेवढे लवकर करायचे, हेच संघासाठी चांगले होते. आम्ही त्याचाच प्रयत्न केला आणि त्यात आम्हाला यश मिळाले.’
याबरोबरच भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना रविंद्र जडेजाला 8 व्या विकेटसाठी इशांतने चांगली साथ दिली होती. त्याने जडेजाबरोबर 60 धावांची भागीदारी रचली. इशांतने 19 धावा केल्या.
या भागादारीबद्दल इशांत म्हणाला, ‘खरं सांगू का मी जेव्हा बाद झालो तेव्हा मला चांगले वाटले नाही. मी जडेजाबरोबर जेवढे जास्त धावा करणार होतो तेवढे संघासाठी चांगले होते. 25 धावांवर 3 बाद अशा परिस्थितीतून आम्ही ज्याप्रकारे पुनरागमन केले, त्यानंतर मला जडेजाबरोबर मोठी भागीदारी करायची होती.’
त्याचबरोबर इशांतने क्षेत्ररक्षण करतानाही चांगली कामगिरी केली. त्याने स्वत:च्या गोलंदाजीवर दोन झेल घेतले. याचे श्रेय इशांतने क्षेत्ररक्षक प्रशिक्षक श्रीधर यांना दिले.
या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 297 धावा केल्या आहेत. तर वेस्ट इंडीजने पहिल्या डावात सर्वबाद 222 धावा केल्या आहेत. त्यामुळे वेस्ट इंडीजला 75 धावांची पिछाडी स्विकारावी लागली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात डावात 3 बाद 185 धावा केल्या आहेत.
https://twitter.com/BCCI/status/1165166569825038336
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–कोहली-रहाणे जोडीने मोडला सचिन-गांगुलीच्या जोडीचा हा खास विश्वविक्रम
–बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूची सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक
–बॅडमिंटन वर्ल्डचॅम्पियनशीप: साईप्रणीतला कांस्यपदक; उपांत्यफेरीत बसला पराभवाचा धक्का