भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला होता. सर्वांना वाटत होते की, धोनी टी-२० विश्वचषक खेळल्यानंतर निवृत्ती जाहीर करेल पण त्याने असे केले नाही. याआधी देखील त्याने २०१४ -१५ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मेलबर्न कसोटी सामन्याच्या समाप्तीनंतर निवृत्ती जाहीर केली होती. अशातच आपल्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळत असलेल्या ईशांत शर्माने धोनीबद्दलची एक आठवण सांगितली आहे.
इंग्लंडविरुध्द खेळवली जात असलेली कसोटी मालिका ईशांत शर्मासाठी खूप खास आहे. याच मालिकेत त्याने कसोटी कारकिर्दीतील ३०० विकेट पूर्ण केले. तसेच मालिकेतील तिसरा सामना ईशांत शर्मा साठी १०० वा कसोटी सामना असणार आहे. या सामन्यापूर्वी ईशांत शर्माने आर अश्विन सोबत यूट्यूबवर एका गमतीदार चर्चेत सहभाग घेतला होता. यात त्यांनी माजी कर्णधार एमएस धोनी बद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
भारतीय संघ २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली ईशांत शर्मा देखील त्या संघात खेळत होता. त्या कसोटी सामन्याबद्दल बोलतांना ईशांत शर्मा म्हणाला, “मला खूप वाईट वाटले होते. मी मेलबर्न कसोटी सामन्यासाठी खूप इंजेक्शन घेतले होते. कारण माझ्या गुडघ्यांमध्ये खूप दुखत होते. मला माहित नव्हते की माही भाई निवृत्ती घेणार आहे. आणि खरंच कोणालाच माहीत नव्हते की असे काही होणार आहे.”
पुढे तो म्हणाला, “ही चौथ्या दिवसातील चहपानाची वेळ होती तेव्हाची गोष्ट आहे, तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ डाव घोषित करणार होते. मी माही भाईला म्हंटले की, मी अजून इंजेक्शन नाही घेऊ शकत. तर यावर प्रतिसाद देत तो म्हणाला, ठीक आहे. आता तुला गोलंदाजी करण्याची आवश्यकता नाहीये. आणि काही क्षणानंतर तो म्हणाला, लंबु, तू मला कसोटी सामन्याच्या मध्येच सोडले आहेस. मला काहीच समजले नाही. त्यांनतर त्याने मला स्पष्ट करून सांगितले की, तू मला माझ्या शेवटच्या कसोटी सामन्यात मध्येच सोडले आहेस.”
या निर्णयानंतर फक्त ईशांत शर्मालाच नव्हे तर सर्वांनाच धक्का बसला होता. यावर ईशांत शर्मा म्हणाला की, “मी स्तब्ध झालो होतो. मी त्याला नंतर म्हंटले की जर मला माहिती असतं की हा तुझा शेवटचा सामना आहे तर मी नक्कीच गोलंदाजी करण्यासाठी आलो असतो.”
महत्वाच्या बातम्या:
INDvsENG 3rd Test Live: भारताला दुहेरी झटका, शुबमन गिल-चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी
भारतीय महिला संघ मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज; या संघाविरुद्ध मायदेशात खेळणार मालिका
शंभरावा सामना खेळणाऱ्या इशांत शर्माचे टीम इंडियाने असे केले मैदानात स्वागत, पाहा व्हिडिओ