दिल्ली। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमात फॉर्मसाठी झगडत असलेला गतविजेता चेन्नईयीन एफसी आणि दिल्ली डायनॅमोज एफसी यांच्यातील नीरस लढतीत अखेर गोलशून्य बरोबरी झाली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला, पण त्यांच्यासमोरील समस्यांचा डोंगर कायम राहिला.
नेहरू स्टेडियमवर 8141 प्रेक्षकांच्या साक्षीने दोन्ही संघ भेदक खेळ करू शकले नाहीत. सहभागी दहा संघांमध्ये पुण्यासह या दोन अशा केवळ तीन संघांनाच अद्याप एकही निर्णायक विजय मिळविता आलेला नाही. त्यांची प्रतिक्षा कायम राहिली.
चेन्नईयीनसाठी जमेची बाब इतकीच की तीन सामने गमावल्यानंतर पहिल्या बरोबरीसह त्यांनी खाते उघडले. त्याबरोबरच चार सामन्यांतून एक गुण मिळवून त्यांनी तळाच्या दहाव्या क्रमांकावरून नववे स्थान गाठले. एफसी पुणे सिटी तळात गेले. चेन्नईयीनचा गोलफरक (4-8, उणे 4), तर पुण्याचा (1-6, उणे 5) असा आहे. दिल्लीची चार सामन्यांतून तिसरी बरोबरी असून एका पराभवासह त्यांचे तीन गुण आहेत. दिल्ली आठव्या क्रमांकावर आहे.
दिल्लीच्या तुलनेत चेन्नईयीनचे प्रयत्न जास्त होते, पण त्यांना अचूकता साधता आली नाही. दुसऱ्या मिनिटाला चेन्नईयीनने प्रयत्न केला. डावीकडून थोई सिंगने मारलेल्या चेंडूवर एली साबिया याने हेडिंग केले, पण दिल्लीचा गोलरक्षक फ्रान्सिस्को डोरोन्सोरो याने चपळाईने डावीकडे जात अडविला. चौथ्या मिनिटाला दिल्लीच्या लालियनझुला छांगटे याने डावीकडून आगेकूच केली, पण त्याने अकारण जास्त ताकद लावल्यामुळे चेंडू वरून गेला.
त्यानंतर दोन्ही संघांना स्थिरावण्यासाठी वेळ लागला. 18व्या मिनिटाला चेन्नईयीनच्या इसाक वनमाल्साव्मा याने डावीकडून चेंडू मारला, पण साबिया याला उडी घेण्याचे टायमिंग साधता आले नाही. त्यामुळे त्याची हेडिंगची संधी हुकली.
22व्या मिनिटाला चेन्नईयीनच्या अँड्रीया ओरलँडी याला नेटकडे पाठ असताना बॉक्सबाहेर पास मिळाला. त्याने चटकन वळत डावीकडील इसाकला पास दिला. इसाकने डाव्या पायाने फटका मारला, पण दिल्लीच्या जियान्नी झुईवर्लून याने वेळीच धोका टाळला. 32व्या मिनिटाला चेन्नईयीनचा कर्णधार इनिगो कॅल्डेरॉन याने चपळाईने उजवीकडे दिल्लीच्या रेने मिहेलीच याचा क्रॉस पास रोखला. अन्यथा अँड्रीया क्लाऊडेरोविच याला सोपी संधी मिळाली असती.
37व्या मिनिटाला दिल्लीकडून छांगटेने प्रयत्न केला, पण चेन्नईयीनचा गोलरक्षक करणजीत सिंग याने चपळाईने नेट सुरक्षित राखले. 42व्या मिनिटाला कार्लोस सालोम याने उजवीकडे थोईच्या दिशेने पास दिला. हा चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या पायाला लागून पुन्हा थोईकडे आला. थोईने फटका मारला, पण डोरोन्सोरोने पंच टाकून चेंडू थोपविला.
45व्या मिनिटाला दिल्लीला पहिल्या सत्रातील सर्वोत्तम संधी मिळाली. छांगटेने डावीकडून आगेकूच केली. त्याने क्लाऊडेरोविच याला अप्रतिम पास दिला, पण हेडिंगवरील प्रयत्नानंतर चेंडू थेट करणजीतच्या हातात गेला. तेव्हा मार्किंग नसल्यामुळे क्लाऊडेरोविचने सरस फटका मारायला हवा होता.
दुसऱ्या सत्रात 49व्या मिनिटाला दिल्लीच्या मिहेलीच याच्या ताब्यातून चेंडू मिळवित रफाएल आगुस्तोने घोडदौड केली. डावीकडून मुसंडी मारणारा सहकारी कार्लोस याच्या दिशेने त्याने धुर्त पास दिला. कार्लोसने बॉक्समध्ये प्रवेश करीत चेंडू मारला, पण तो अचूकता साधू शकला नाही. 54व्या मिनिटाला ओरलँडीने डावीकडून थोईकडे चेंडू मारला. थोईने उडी मारली, पण चेंडू त्याच्या डोक्यावरून गेला.
58व्या मिनिटाला दिल्लीच्या नारायण दासने डावीकडून आगेकूच करीत नंदकुमार शेखरला पास दिला. नंदकुमारने उजव्या पायाने मारला फटका भेदक नव्हता. त्यामुळे करणजीतने चेंडू सहज अडविला.
63व्या मिनिटाला चेन्नईयीनच्या ओरलँडीने डावीकडून फ्री किकवर मारलेला चेंडू रोखण्यासाठी दिल्लीचा गोलरक्षक डोरोन्सोरो पुुढे सरसावला, पण त्याला कार्लोसने धरून ठेवले. चेंडू पडला आणि झुईवर्लून याच्या हाताला लागला, पण डोरोन्सोरोला त्याआधीच फाऊल करण्यात आले होते. त्यामुळे चेन्नईयीनला पेनल्टी मिळू शकली नाही. 70व्या मिनिटाला डोरोन्सोरोच्या चपळाईने दिल्लीला तारले. चेन्नईयीनने प्रतिआक्रमण रचले होते. इसाकने कार्लोसला पास दिला. कार्लोसला अचूक कोन साधता येऊ नये म्हणून डोरोन्सोरो आधीच पुढे सरसावला आणि त्याने चपळाईने चेंडू अडविला.
महत्त्वाच्या बातम्या:
–अशी कामगिरी करणारा अजय ठाकूर ठरला केवळ तिसराच खेळाडू
–प्रत्येक विकेटमागे दहा रूपये मिळवणाऱ्या खेळाडूला मिळाली क्रिकेटमधील सर्वात मोठी संधी