fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ISL 2018: नॉर्थइस्ट-एटीके यांच्यात गोलशून्य बरोबरी

गुवाहाटी।  हिरो इंडियन सुपर लीगमध्ये पाचव्या मोसमात नॉर्थइस्ट युनायटेड एफसी आणि एटीके (अॅटलेटिको दी कोलकाता) यांच्यात आज ( 8 डिसेंबर) झालेली लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. दोन्ही संघांना निर्णायक चाली रचता आल्या नाहीत. त्यामुळे नॉर्थइस्टच्या समर्थकांची निराशा झाली. येथील इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियमवर अंतिम टप्यात एटीकेचे काही प्रयत्न फोल ठरले.

नॉर्थइस्टने 11 सामन्यांत पाचवी बरोबरी साधली असून पाच विजय व एका पराभवासह त्यांचे 20 गुण झाले आहेत. मुंबई सिटी एफसीचेही 10 सामन्यांतून 20 गुण आहेत. यात मुंबईचा गोलफरक 3 (13-10), तर नॉर्थइस्टचा 6 (15-9) असा सरस आहे. बेंगळुरू एफसी 9 सामन्यांतून 23 गुणांसह आघाडीवर आहे. एटीकेला 11 सामन्यांत चौथी बरोबरी साधावी लागली असून चार विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 16 गुण झाले. त्यांचे सहावे स्थान कायम राहिले.

आठव्या मिनिटाला बार्थोलोम्यू ओगबेचे याने रेडीम ट्लांग याला बॉक्सबाहेर पास दिला, पण रेडीमला ताकद आणि अचूकता यांत समन्वय साधता आली नाही. दहाव्या मिनिटाला एटीकेच्या अंकित मुखर्जी याने किगन परेरा याला पाडले. त्यामुळे त्याला यलो कार्ड दाखविण्यात आले.

नॉर्थइस्टने सुरवात चांगली करीत चेंडूवर ताबा मिळविला. त्यामुळे एटीकेच्या बचाव फळीवर दडपण आले होते.  21व्या मिनिटाला नॉर्थइस्टकडून थेट फटक्याची प्रथमच नोंद झाली. रेडीमने बॉक्सबाहेरून मैदानालगत ड्रिबलिंग करीत थेट फटका मारला. हा चेंडू एटीकेच्या आंद्रे बिके याच्या पायांमधून गेला, पण गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्य याने एकाग्रता ढळू दिली नाही आणि अचूक बचाव केला.

एटीकेच्या एव्हर्टन सँटोस याने 30व्या मिनिटाला बलवंत सिंग याला अप्रतिम पास दिला. त्यानंतर बलवंतने मात्र शिताफीने फटका मारला नाही. त्याचा कमकुवत फटका नॉर्थइस्टचा गोलरक्षक पवन कुमार याने सहज अडविला. पुर्वार्धाच्या अंतिम टप्यात नॉर्थइस्टचा चिवट बचावपटू मिस्लाव कोमोर्स्की याला मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे मैदान सोडावे लागले. त्यामुळे गुरविंदर सिंग मैदानावर उतरला.

दुसऱ्या सत्रात 49व्या मिनिटाला गुरविंदरची ढिलाई नॉर्थइस्टला थोडक्यात भोवली नाही. त्याच्या ढिलाईमुळे मॅन्युएल लँझरॉतला गोलक्षेत्रात चेंडू मिळाला. लँझरॉतने शिताफीने हालचाल करीत नेटच्या दिशेने फटका मारला, पण पवनने तो अडविला.

मुंबईच्या बलवंतला 63व्या मिनिटाला ऑफसाईड ठरविण्यात आले. त्यावेळी नॉर्थइस्टच्या बचाव फळीने त्याला लावलेला सापळा यशस्वी ठरला. चार मिनिटांनी एटीकेची सुवर्णसंधी हुकली. लँझरॉतने नॉर्थइस्टच्या किगन परेरा याला चकवून चेंडू मारायचा प्रयत्न केला, पण चेंडू अडविताना त्याने सुरवातीला हाताचा वापर केल्याचे रिप्लेत दिसले. पंचांच्या मात्र ते लक्षात आले नाही. नॉर्थइस्टच्या सुदैवाने ही चाल फिनिशींगअभावी अपयशी ठरली.

नॉर्थइस्टच्या रिगन सिंग याला 72व्या मिनिटाला यलो कार्ड दाखविण्यात आले. त्याने रिकी लल्लावामाव्मा याला धसमुसळा खेळ करून पाडले. 81व्या मिनिटाला एटीकेला मिळालेल्या फ्री किकवर अल मैमौनी नौसैर याने चेंडू मारला. त्यावेळी नॉर्थइस्टच्या बचाव फळीचा गोंधळ उडाला. त्यातून एव्हर्टन सँटोसला संधी मिळाली, पण त्याने मारलेला फटका गुरविंदरने ब्लॉक केला, हा चेंडू नंतर हितेश शर्मा याच्याकडे गेला. त्याने लांबून मारलेला फटका मात्र स्वैर होता.

निर्धारीत वेळ संपण्यास एक मिनीट बाकी असताना एटीकेचा आणखी एक प्रयत्न वाया गेला. त्यात मैमौनी याने कॉर्नरवर मारलेला चेंडू बॉक्समध्ये गेला. त्यावर आंद्रे बिके याने हेडिंग केले, पण नॉर्थइस्टच्या निखील कदम याने ब्लॉकिंग केले. त्यानंतर चेंडू कॉर्नरसाठी बाहेर गेला. रिप्लेत ज्योस लेऊदो याच्या हाताला चेंडू लागल्याचे दिसले, पण ते पंचांच्या लक्षात आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

एकेकाळी आॅस्ट्रेलियाला नडलेला भारतीयच आला विराटच्या मदतीला

आॅस्ट्रेलियाकडून पुन्हा रडीचा डाव, आता कोहली निशाण्यावर

‘डुबकी किंग’ परदीप नरवालची प्रो कबड्डीच्या विक्रमांत डुबकी

You might also like