कोलकता। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (२६ ऑक्टोबर) येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर माजी विजेता अटलेटिको दी कोलकाता (एटीके) आणि गतविजेता चेन्नईयीन एफसी यांच्यात लढत होणार आहे. निर्णायक विजय या एकमेव उद्देशाने दोन्ही संघ खेळतील आणि त्यासाठी विजेत्यांना साजेसा खेळ करण्याचा त्यांचा निर्धार असेल.
गुणतक्त्याचे चित्र बघता दोन्ही संघांना विजय अनन्यसाधारण महत्त्वाचा असेल. एटीकेने चार सामन्यांतून चार गुण मिळविले आहेत, तर चेन्नईयीनकडे एकमेव गुण आहे.
एटीकेला घरच्या मैदानावर सलग दोन पराभव पत्करावे लागले. त्यानंतर भक्कम कलाटणी देत त्यांनी अवे सामन्यांत दिल्ली डायनॅमोजला हरविले, तर जमशेदपूर एफसीविरुद्ध बरोबरी साधली. गुणतक्त्यात एटीकेच्या वर असलेल्या सर्व पाच संघांचा एक सामना कमी झाला आहे. यामुळे स्टीव कॉपेल यांच्या मार्गदर्शनाखालील एटीकेला तीन गुणांपेक्षा काही कमी मिळवून चालणार नाही.
कॉपेल यांनी सांगितले की, “बरेच संघ एकाच पातळीवर आहेत, पण काही जणांनी वरची पायरी गाठली आहे. आम्हाला सुद्धा प्रतिष्ठेच्या क्रमांकांवर जायचे आहे. त्यासाठी आम्हाला घरच्या मैदानावर विजय मिळवावा लागेल. घरच्या मैदानावर स्थानिक समर्थकांच्या उपस्थितीत आम्हाला कमाल गुण मिळवावे लागतील.”
दुसरीकडे चेन्नईयीनला सुद्धा तीन गुणांची फार गरज आहे. त्यांना मोसमात अद्याप विजय मिळविता आलेला नाही, पण दिल्ली डायनॅमोजशी गोलशून्य बरोबरी साधत त्यांनी अपयशी मालिका खंडित केली.
या निकालानंतर प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांची आशा वाढली आहे. दिल्लीचे आक्रमण भेदक नसले तरी चेन्नईयीन संघाने अखेर गोल पत्करला नाही. यावेळी मात्र निर्णायक विजय मिळाला नाही तर गतविजेते प्ले-ऑफ शर्यतीत पिछाडीवर पडलेले असतील.
ग्रेगरी यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे पत्रकार परिषदेला सहाय्यक प्रशिक्षक साबीर पाशा उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, आम्ही चार सामने खेळलो आहोत. संघात काही नवे खेळाडू आहेत. त्यांना स्थिरावण्यास थोडा वेळ लागत आहे. दिवसागणिक खेळ सुधारतो आहे. चुका टाळण्यासाठी आम्ही सराव करीत आहोत, पण आम्ही एकूण खेळ सुधारतो आहोत, असे वाटते.
गतविजेत्यांची बचाव फळी कमकुवत वाटत आहे, पण दिल्लीविरुद्ध इनिगो कॅल्डेरॉन आणि एली साबिया यांची जोडी आत्मविश्वासाने खेळली. त्यांचे फिनिशिंग मात्र अपेक्षेनुसार झाले नाही. कार्लोस सालोम याने निर्माण केलेल्या संधी बघता ग्रेगरी गेल्या मोसमात सर्वाधिक गोल केलेला जेजे लालपेखलुआ याला अंतिम संघात आणू शकतील.
पाशा यांनी सांगितले की, एटीकेचा संघ भक्कम आहे. घरच्या मैदानावर त्यांनी दोन सामने गमावले आहेत यात शंका नाही, पण आज ते भक्कम खेळ करतील. त्यांंना कमी लेखून चालणार नाही. ते चिवट खेळ करतात आणि प्रतिस्पर्ध्याला दडपणाखाली आणतात.
कॉपेल आणि ग्रेगरी हे दोन्ही प्रशिक्षक भक्कम बचावात्मक संघटनावर बराच भर देतात. त्यांची प्रतिआक्रमणाला पसंती असते. इंग्लंडच्या या दोन्ही प्रशिक्षकांमधील लढत नक्कीच पर्वणी ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: जमशेदपूरशी बरोबरीसह चिवट नॉर्थइस्टची आघाडी
–‘करन ब्रदर्स’मुळे १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडली इंग्लंड संघाबाबत ही खास गोष्ट
–मुंबई पोलिसांनी अनोख्या अंदाजात केले विराट कोहलीचे कौतुक