पुणे। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (२२ ऑक्टोबर) एफसी पुणे सिटीची बेंगळुरू एफसीविरुद्ध लढत होत आहे. दोन्ही संघांच्या आघाडी फळीत मुकाबला रंगेल.
पुणे सिटी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील घरच्या मैदानावर खेळणार असले तरी त्यांच्यासाठी पहिला विजय मिळविणे अवघड असेल. प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावरील (बाहेर) पहिल्या दोन सामन्यांतून पुण्याला एकच गुण मिळविता आला. हा संघ नवव्या क्रमांकावर आहे.
पुण्याचे प्रशिक्षक मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांनी सांगितले की, “बेंगळुरू एफसी हा भारतातील सर्वोत्तम संघ असल्याचे मला वाटते. दुसऱ्या मोसमात बहुतांश खेळाडू कायम ठेवून ते खेळत आहेत. त्यांनी केवळ दोन-तीन खेळाडू बदलले आहेत. संघ कायम असणे फार महत्त्वाचे असते. अल्बर्ट रोका गेले असले तरी नवे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात त्यांच्यासारखेच आहेत. कार्यपद्धतीमध्ये सातत्य ठेवणे महत्त्वाचे असते.”
विजयाची नितांत गरज असलेल्या पुण्याने सामना जिंकल्यास तो त्यांचा मोसमातील आणि बेंगळुरूवरील सुद्धा पहिलाच विजय असेल. गेल्या मोसमात बेंगळुरूविरुद्ध ते प्ले ऑफमध्ये हरले होते.
पोर्तुगाल यांनी पुढे सांगितले की, “आम्ही फार चांगली तयारी करीत आहेत. आम्हाला बेंगळुरूच्या जमेच्या आणि कमकुवत बाजूंची चांगली माहिती आहे. आम्ही आमच्या काही कल्पना आखल्या आहेत. विजय कसा मिळवायचा याची योजना आम्हाला माहित आहे.”
स्पेनच्या पोर्तुगाल यांना गतउपविजेत्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध एमिलीयानो अल्फारो आणि मार्सेलिनीयो अशा महत्त्वाच्या स्ट्रायकर्सकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. गोलचा अभाव हा पुण्यासाठी आतापर्यंत नकारात्मक मुद्दा ठरला आहे. दोन सामन्यांत त्यांना एकच गोल करता आला आहे. त्यांचे २१ प्रयत्नांतील अचूकतेचे ४.७६ हे प्रमाण सहभागी दहा संघांमध्ये सर्वांत कमी आहे.
बेंगळुरूने गेल्या मोसमात दमदार पदार्पण केले. यंदा मात्र त्याची सुरवात तेवढी सफाईदार झालेली नाही. सलामीला त्यांनी गतविजेत्या चेन्नईयीन एफसीवर प्रभावी विजय मिळविला, पण घरच्या मैदानावर जमशेदपूर एफसीने त्यांना बरोबरीत रोखले.
आता ते बाहेरच्या मैदानावरील सामने खेळण्यासाठी दौऱ्यावर आहेत. गेल्या मोसमात त्यांनी नऊ पैकी सात सामने बाहेरच्या मैदानावर जिंकले होते. हा फॉर्म मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.
कुआद्रात म्हणाले की, “पुणे सिटीविरुद्धचे सामने नेहमीच अवघड असतात. यावेळीही मला वेगळी अपेक्षा नाही. दोन आठवड्यांपूर्वी माझी आणि पोर्तुगाल यांची माद्रिदमध्ये भेट झाली. युएफा लायसन्सच्या नुतनीकरणासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी त्यांनी संघात आक्रमणाचे किती पर्याय आहेत याबद्दल आनंद व्यक्त केला होता. आमच्याविरुद्ध पारडे फिरविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळे आम्हाला पुरेशी खबरदारी बाळगावी लागेल.”
कुआद्रात यांच्याकडे मिकू आणि सुनील छेत्री यांच्या रुपाने लीगमधील एक सर्वाधिक भेदक जोडी आहे. नव्या मोहिमेत या दोघांनी प्रत्येकी एक गोल यापूर्वीच नोंदविला आहे. आवडत्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मैदानावर उतरून गोल करण्यासाठी ते आतूर असतील.
गेल्या मोसमात पुण्याविरुद्ध चार सामन्यांत या जोडीने सात गोल केले. एका प्रतिस्पर्ध्याविरुद्धचे हे प्रमाण सर्वाधिक आहे. धाडसी खेळ करणाऱ्या दोन संघांमधील ही लढत रंगतदार ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या:








