पुणे। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात गतउपविजेत्या बेंगळुरू एफसीने एफसी पुणे सिटीवरील वर्चस्वाची मालिका कायम राखत 3-0 असा दणदणीत विजय मिळविला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या सामन्यात बेंगळुरूचा कर्णधार सुनील छेत्रीने पूर्वार्धात दोन मिनिटांच्या अंतराने केलेले दोन गोल बहुमोल ठरले. व्हेनेझुएलाच्या मिकूने उत्तरार्धात एका गोलची भर घातली.
बेंगळुरूने तीन सामन्यांत दुसरा विजय मिळविला असून त्यांनी एक बरोबरी साधली आहे. त्यांचे सात गुण झाले. बेंगळुरूने पाचवरून थेट आघाडीच्या स्थानावर झेप घेतली. नॉर्थइस्टचे तीन सामन्यांतून सात गुण आहेत. नॉर्थइस्टने सात गोल केले असून विरुद्ध संघांनी पाच गोल केले आहेत. बेंगळुरूने सहा गोल करताना तर त्यांच्या विरुद्ध दोनच झाले आहेत. त्यामुळे त्यांचा गोलफरक चार आहे. हा सरस गोलफरक निर्णायक ठरला.
पुणे सिटीला तीन सामन्यांत दुसरा पराभव पत्करावा लागला. एका बरोबरीसह त्यांच्या खात्यात एकमेव गुण आहे. यामुळे दहा संघांमध्ये त्यांचा नववा क्रमांक आहे. पुण्याला एकच गोल करता आला आहे. त्यांचा गोलफरक उणे पाच असा झाला आहे. पुण्यासाठी मागील मोसम गाजविलेल्या एमिलीयानो अल्फारो आणि मार्सेलिनीयो या जोडीला फॉर्म सापडला नाही. त्यामुळे पुणेकर फुटबॉलप्रेमींची निराशा झाली, छेत्री-मिकू या प्रतिस्पर्धी जोडीच्या दर्जेदार खेळासमोर पुण्याची बचाव फळी निरुत्तर झाली.
बेंगळुरूला स्थिरावण्यास वेळ लागला. छेत्रीने आधी एक चांगली संधी दवडली होती, पण त्याने लवकरच भरपाई केली. ४१व्या मिनिटाला अचूक अंदाज घेत त्याने पुण्याच्या बचाव फळीच्या मागून घोडदौड केली. त्याच्या हालचाली हेरत डिमास डेल्गाडो याने अचूक पास दिला. मग छेत्रीने पुण्याचा गोलरक्षक विशाल कैथ याला चकविले. ४३व्या मिनिटाला मिकूने बॉक्समध्ये डावीकडे छेत्रीला पास दिला. छेत्रीला रोखण्याच्या प्रयत्नात पुण्याचा सार्थक गोलुई तोल जाऊन घसरला. मग छेत्रीने ताकदवान फटका मारत कैथला चकविले. ६४व्या मिनिटाला मिकूने पुण्याच्या साहील पन्वरला दाद लागू दिली नाही. त्याने चेंडूवर ताबा मिळवित नेटच्या डाव्या कोपऱ्यात मैदानालगत जोरदार फटका मारला. कैथला झेप टाकूनही चेंडू अडविता आला नाही.
पूर्वार्धात सातव्या मिनिटाला एमिलीयानो अल्फारो याने चाल रचत दिलेल्या पासवर मार्सेलिनीयोलाचा फटका स्वैर होता. बेंगळुरूने संथ सुरवातीनंतर चालींचा धडाका लावला. १५व्या मिनिटाला मिकूने पुण्याच्या मॅट मिल्सला चकवून चेंडूवर ताबा मिळविला. त्याने मारलेला फटका नेटवर गेला. १६व्या मिनिटाला उदांता सिंगने उजवीकडून चाल रचली, पण त्यास साथ मिळू शकली नाही. २४व्या मिनिटाला हर्मनजोत खाब्रा याच्या पासवर उदांताचा फटका पन्वरने रोखला.
त्याआधी १९व्या मिनिटाला मार्सेलिनीयोने फ्री किकवर मारलेला फटका बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू याने रोखला. पुर्वार्धाच्या अंतिम टप्यात डेल्गाडोचा प्रयत्न थोडक्यात फसला.
उत्तरार्धात प्रारंभी पुण्याकडून मार्टिन डियाझने प्रयत्न केला, पण ५२व्या मिनिटाला त्याने मारलेला फटका थेट गुरप्रीतकडे केला. ६६व्या मिनिटाला कार्लोसने मारलेल्या फटक्याच्यावेळी सुद्धा हेच घडले. गुरप्रीतने उजवीकडे झेपावत चेंडू अडविला. ७२व्या मिनिटाला जोनाथन व्हिला याच्या फटक्यात पुरेशी ताकद नव्हती. ७९व्या मिनिटाला मार्सेलिनीयोचा फटका गुरप्रीतने छातीवर थोपविला.
दुसरीकडे बेंगळुरूने काही प्रयत्न करीत दडपण कायम ठेवले. मिकूने तिसरा गोल नोंदवित बेंगळुरूला मोठी आघाडी मिळवून दिली. गुरप्रीतने बेंगळूरूचे नेट सुरक्षित राखत विजयात मोलाचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या:
–हरभजनने केले विंडीजच्या फलंदाजाबद्दल मोठे भाकित
–दुसरा वनडे सामना टीम इंडियासाठी ठरणार ऐतिहासिक