गुवाहाटी। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) येथील इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियमवर आज (25 ऑक्टोबर) नॉर्थइस्ट युनायटेडची जमशेदपूर एफसी संघाविरुद्ध लढत होणार आहे. नॉर्थइस्टला मुख्य प्रशिक्षक एल्को शात्तोरी यांच्या मार्गदर्शनाखाली फॉर्म गवसला असून तो कायम राखण्याचा त्यांना निर्धार असेल.
शात्तोरी यांच्या संघाने सलामीला एफसी गोवा संघाला 2-2 असे बरोबरीत रोखले. त्यानंतर त्यांनी कोलकात्यामध्ये दहा खेळाडूंनिशी खेळावे लागलेल्या एटीकेला एकमेव गोलने हरविले. मग चेन्नईत गतविजेत्या चेन्नईयीन एफसीला पिछाडीवरून 4-3 असे गारद करीत नॉर्थइस्टने खळबळ उडवून दिली.
नायजेरियाचा फॉरवर्ड बार्थोलोम्यू ओगबेचे हा जमशेदपूरसाठी सर्वाधिक धोकादायक असेल. त्याने आताच चार गोल केले आहेत. यात चेन्नईयीनविरुद्धच्या हॅट्ट्रिकचा समावेश आहे. उरुग्वेच्या फेडेरिको गॅलेगो याने सुद्धा आक्रमक खेळ केला असून तो प्रभावी ठरला आहे. मध्य क्षेत्रात रॉलीन बोर्जेस याने बहुमोल कामगिरी बजावली आहे. दोन सामन्यांत त्याने दोन निर्णायक गोल केले आहेत.
शात्तोरी यांच्या संघाच्या बचावाची जमशेदपूरच्या आक्रमणासमोर कसोटी लागेल. शात्तोरी म्हणाले की, “समन्वय साधून संघटित खेळ करायला मला नेहमीच आवडते. आतापर्यंत हे धोरण चांगले ठरले आहे. आम्हाला वैयक्तिक चुकांमुळे गोल पत्करावे लागले आणि हे टाळण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. जोपर्यंत आम्ही प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त गोल करीत आहोत तोपर्यंत मला फिकीर नाही.”
जमशेदपूरचा मोसमातील प्रारंभ सातत्यपूर्ण ठरला आहे. त्यांनी मुंबईत मुंबई सिटी एफसीवर 2-0 असा विजय मिळविला. त्यानंतर त्यांनी बेंगळुरू एफसी आणि एटीके यांच्याविरुद्ध बरोबरी साधली. सेझार फरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली संघात स्पॅनीश क्रांती घडत आहे. मारीओ आर्क्वेस याचा समावेश फलदायी ठरला आहे.
सर्जिओ सिदोंचा हा स्पेनचा आणखी एक खेळाडू आक्रमणात चमक दाखवित आहे. त्याने दोन गोल नोंदविले आहेत. मायकेल सुसैराज आणि जेरी माहमिंगथांगा या भारतीय विंगर्सनीही लक्ष वेधून घेतले आहे.
फरांडो यांनी सांगितले की, “पहिल्या दिवसापासून या घडीपर्यंत माझ्या संघातील सर्व भारतीय खेळाडूंनी कामगिरीत सुधारणा केली आहे. जेरी आणि मायकेल हे चांगले खेळाडू आहेत. ते मेहनत करीत आहेत, पण त्यांना आणखी सुधारणा करावी लागेल. काही वेळा ते अकारण जास्त धावतात. फुटबॉलमध्ये काही वेळा वेगाने धावायचे असते, तर काही वेळा वेग कमी करायचा असतो हे तुम्हाला समजले पाहिजे. केव्हा धावायचे आणि केव्हा थांबायचे हे कळणे महत्त्वाचे असते.”
फरांडो यांना गुरुवारी प्रतिक्षा असेल ती मार्की खेळाडू टीम कॅहील याने खाते उघडण्याची. नॉर्थइस्टसाठी किगन परेरा, सीमरनजीत सिंग आणि किवी झिमोमी हे जायबंदी खेळाडू अनुपस्थित असतील, पण जमशेदपूरच्या आव्हानाला सामोरे जाण्यायास नॉर्थइस्ट सज्ज असेल. या लढतीमधील विजयी संघ आघाडी घेऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: गोव्याचा मुंबईला पेनल्टीसह पंच
–७२ तासातच विराट कोहलीने मो़डला रोहित शर्माचा विक्रम
–कर्णधार म्हणून विराटने केली सलग दुसऱ्या वर्षी ही विलक्षण कामगिरी