चेन्नई। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (29 नोव्हेंबर) चेन्नईयीन एफसी आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात येथील नेहरू स्टेडियमवर महत्त्वाचा सामना होणार आहे. गतवर्षी पटकावलेले जेतेपद राखणे किती अवघड आहे याची जाणीव चेन्नईयीनला झाली आहे. आधीच्या गतविजेत्यांप्रमाणेच हा संघ सुद्धा झगडतो आहे. त्यातही स्पर्धेचा निम्मा टप्पा पूर्ण झाला असतानाच बाद फेरीच्या आशा सोडून देण्याची वेळ त्यांच्यावर येण्याची शक्यता आहे.
चेन्नईयीनची मोहिम विस्कळीत झाली असताना त्यांच्यासमोर दाक्षिणात्या डर्बीसाठी ब्लास्टर्सचे आव्हान आहे. गतविजेता चेन्नईयीन नवव्या स्थानावर आहे. आठ सामन्यांतून त्यांना एकच विजय मिळविता आला आहे. त्यांनी बरोबरी सुद्धा एकच साधली आहे. ब्लास्टर्सविरुद्ध बरोबरी झाली तरी या संघाच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात येण्याची शक्यता असेल. त्यातच पराभव झाल्यास त्यांना आणखी धक्का बसेल.
जॉन ग्रेगरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ गेल्या मोसमात अंतिम सामन्यात बेंगळुरू एफसीला गारद केलेल्या बलाढ्य संघाच्या आसपासही जाणार नाही. त्यांचा बचाव कडेकोट राहिलेला नाही. त्यांना 16 गोल पत्करावे लागले आहेत. त्यांच्या गोलचे प्रमाणही कमी आहे. त्यांना केवळ दहा गोल करता आले आहे. शैलीदार स्ट्रायकर जेजे लालपेखलुआ याला अद्याप खातेच उघडता आलेले नाही. याच जेजेने मागील मोसमात सात गोल केले होते.
अशावेळी चेन्नईयीन पारडे कसे फिरविणार हा प्रश्न पडतो. ग्रेगरी यांनी सांगितले की, “सर्व तीन गुण मिळविणे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. हा सामना चाहत्यांसाठी सुद्धा किती महत्त्वाचा आहे हे आमच्या खेळाडूंच्या लक्षात आले पाहिजे. बेंगळुरू एफसीविरुद्ध पहिला सामना गमावला तेव्हा चाहत्यांना शेरेबाजी ऐकून घ्यावी लागली. या लिगमध्ये प्रतिष्ठा पणास लागलेली असते. आम्हाला विजय मिळवून पुन्हा बाद फेरीच्या शर्यतीत येण्याची गरज आहे.”
वैयक्तिक चुकांमुळे विजय मिळविता आलेला नाही असे कारण ग्रेगरी यांनी दिले. खेळाडू तेच असले तरी ते आता भरवशाचे राहिलेले नाहीत. त्यांनी सांगितले की,” बरेच खेळाडू गेल्या मोसमात भरवशाचे होते. यंदा अशी स्थिती राहिलेली नाही. जे खेळाडू चुका करणार नाहीत अशी अपेक्षा तुम्ही बाळगता त्यांनीच चुका केलेल्या आहेत.”
ब्लास्टर्ससाठी सुद्धा यंदाचा मोसम फारसा चांगला ठरलेला नाही. सलामीला एटीकेला हरविल्यानंतर त्यांना अद्याप विजय मिळविता आलेला नाही. सात गुणांसह हा संघ सातव्या स्थानावर आहे. गोल करण्यात हा संघ झगडतो आहे. गोल झालेच तर मग आघाडी टिकविणे ही समस्य ठरते आहे. नॉर्थइस्ट युनायटेड एफसीविरुद्ध मागील सामन्यात हेच दिसून आले. 90व्या मिनिटापर्यंत आघाडीवर राहूनही त्यांना 1-2 असे पराभूत व्हावे लागले.
ब्लास्टर्सचे प्रशिक्षक डेव्हिड जेम्स यांनी सांगितले की,” मी प्रत्येक बाजूने समस्येचा विचार केला आहे. त्यातही अखेरच्या क्षणी होणाऱ्या गोलांचा जास्त विचार केला आहे. मुंबईविरुद्ध आम्ही फार काही करू शकत नव्हतो. याचे कारण त्यांच्या खेळाडूने (प्रांजल भूमीज) लांब अंतरावरून फटका मारायचे ठरविले आणि त्याने फटका मारल्यावर चेंडू नेटमध्ये गेला. दिल्लीविरुद्ध अँड्रीया क्लाऊडेरोविच याने गोल केला तेव्हा तो ऑफसाईड होता. याशिवाय संदेश झिंगन जायबंदी होता. नॉर्थइस्टविरुद्ध 90व्या मिनिटाला संदेशविरुद्ध पेनल्टी दिली गेली. त्यानंतर फाऊल होऊनही एका खेळाडूला आत जाऊ देण्यात आले नाही. फाऊलचा फटका बसूनही आम्ही 11 विरुद्ध 10 खेळत होतो. आमच्या बाजूने न गेलेल्या निर्णयांबद्दल आपण बोलत आहोत.”
आता जेम्स यांना विजय मिळवून मोसमाचे पारडे फिरविण्याची आशा आहे. दुसरीकडे चेन्नईयीनला घसरण थांबविण्याची आशा आहे. अशावेळी गुरुवारची लढत चुरशीची होईल. याचे कारण दोन्ही संघांना पराभव परवडणारा नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018:एटीके-एफसी गोवा यांच्यात गोलशून्य बरोबरी
–हॉकी विश्वचषक २०१८: भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व कायम
–विकेटकीपर म्हणून पार्थिवच हवा, रिषभ पंत नकोच