चेन्नई| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (2 डिसेंबर) गतविजेत्या चेन्नईयीन एफसीची माजी विजेत्या अॅटलेटिको दी कोलकाता (एटीके)विरुद्ध लढत होत आहे. मागील वर्षी जिंकलेले जेतेपद मोसमाच्या मध्यासच गमवावे लागण्याचा धोका चेन्नईयीनसमोर आहे. त्यामुळे ही लढत त्यांच्यासाठी जिंकू किंवा मरु इतक्या महत्त्वाची आहे.
आयएसएलच्या इतिहासात आतापर्यंत एकाही क्लबला जेतेपद राखता आलेले नाही, पण त्याचवेळी एकाही संघावर इतक्या लवकर आशा संपुष्टात येण्याची वेळही ओढविलेली नाही. चेन्नईयीन नऊ सामन्यांतून पाच गुणांसह आठव्या स्थानावर आहे. जॉन ग्रेगरी यांचा संघ आतापर्यंत सर्वच क्षेत्रांत निराशाजनक खेळ करतो आहे. त्यांना घरच्या मैदानावर अद्याप एकही विजय मिळविता आलेला नाही. रविवारी सुद्धा यात यश आले नाही तर त्यांच्यासाठी लीग संपलेली असेल, अशीच चिन्हे आहेत.
ग्रेगरी यांनी सांगितले की, “आम्हाला बरीच मेहनत करावी लागेल आणि संयमही ठेवावा लागेल. आम्हाला आमच्या क्षमतेवर जास्त विश्वास ठेवावा लागेल. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध तुम्हाला खेळाडूंच्या देहबोलीत फरक दिसला असेल. आपण चांगला खेळ केल्याची त्यांना कल्पना होती. सामन्यानंतर तुम्ही मैदानाबाहेर येता तेव्हा खेळाडू म्हणून चांगले खेळल्याची तुम्हाला जाणीव असते. ते तुम्हाला सांगण्याची गरज नसते.”
चेन्नईयीनसाठी बचाव समस्या ठरली आहे. त्यात चांगली कामगिरी झाली तर आघाडी फळी भरकटली आहे. मध्य फळी सुद्धा भक्कम राहिलेली नाही. त्यामुळे ग्रेगरी यांना इनिगो कॅल्डेरॉन यास काही वेळा केंद्रीय मध्यरक्षक म्हणून खेळविणे भाग पडले आहे.
इंग्लंडच्या ग्रेगरी यांच्यासाठी सर्वाधिक काळजीची गोष्ट म्हणजे संघाला संधीचा फायदा उठविण्यात अपयश आले आहे. गुरुवारी मागील सामन्यात ब्लास्टर्सविरुद्ध त्यांनी असंख्य संधी दवडल्या.
ग्रेगरी यांनी पुढे सांगितले की, स्टीव कॉपेल यांच्या संघाविरुद्ध खेळणे नेहमीच अवघड असते. गेल्या मोसमात आमचे दोन सामने झाले. त्यात तीन गोल झाले, यातील एक पेनल्टीवर झाला. यावेळी तर आंद्रे बिके आल्यामुळे त्यांचा संघ आणखी भक्कम झाला आहे. त्यांचा बचाव भेदणे खरोखरच अवघड असते.
कॉपेल यांच्या एटीकेचा बचाव अगदी चिवट राहिला आहे. त्यांच्याविरुद्ध आठच गोल झाले आहेत. एफसी गोवासारख्या धडाकेबाज प्रतिस्पर्ध्याविरुद्ध एकही गोल न पत्करलेला हा एकमेव संघ आहे. बचाव फळीत आंद्रे बिके आणि जॉन जॉन्सन यांनी लक्षणीय कामगिरी केली असून त्यांचा अनुभव बहुमोल ठरला आहे. प्रोणय हल्दर निलंबनामुळे ही लढत खेळू शकणार नाही आणि एटीकेसाठी ही प्रतिकूल बाब आहे.
भारताच्या आंतरराष्ट्रीय लढतींमुळे ब्रेक आला होता. त्यानंतरच्या टप्यात एटीकेला एकही गोल करता आलेला नाही आणि ही कॉपेल यांच्यासाठी काळजीची बाब आहे. ते म्हणाले की, जास्त सामने आणि जास्त गुण जिंकण्यासाठी आम्हाला जास्त गोल करण्याची गरज आहे. कालू उचे आणि एमिलीयानो अल्फारो यांच्या रुपाने आम्ही दोन भक्कम स्ट्रायकर्स गमावले आहेत. अल्फारो तर आमच्यासाठी चेंडूला एकदाही किक मारू शकला नाही. त्यामुळे आघाडी फळीत काही उणीवा राहणे अपरिहार्य आहे, पण आम्ही कसून प्रयत्न करीत आहोत. जास्त गोल व्हावेत म्हणून संधींचा फायदा उठविण्याकरीता आम्ही खेळाडूंसह कसून सराव करीत आहोत.
त्यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक संघासाठी ब्रेकपूर्वीचे सामने महत्त्वाचे असतात. ख्रिसमसपूर्वी तुमची लिगमधील स्थिती चांगली असली पाहिजे. शेवटच्या सहा सामन्यांत जोर लावून पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या स्थितीत तुम्ही असले पाहिजे. प्रत्येक संघ त्यासाठीच प्रयत्नशील असतो.
या लढतीत आपल्या संघाला गोल करण्यात यश येईल अशी ग्रेगरी आणि कॉपेल या दोन्ही प्रशिक्षकांची आशा असेल. अन्यथा त्यांचे आव्हान संपुष्टात येण्याचा धोका आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: जमशेदपूरविरुद्ध बरोबरीसह नॉर्थइस्ट दुसऱ्या क्रमांकावर
–हॉकी विश्वचषक २०१८: अर्धा डझनपेक्षा जास्त गोल करत नेदरलॅंड्सने केला मलेशियाचा दारूण पराभव
–Video: कर्णधार विराट कोहलीने विकेट घेत केले असे जबरदस्त सेलिब्रेशन