कोची। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) आज (20 ऑक्टोबर) केरळा ब्लास्टर्सची दिल्ली डायनॅमोज एफसीविरुद्ध लढत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे. मोसमाला उत्तम सुरवात झाली असल्यामुळे घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठविण्याचा ब्लास्टर्सचा प्रयत्न राहील.
ब्लास्टर्स दोन सामन्यांतून चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दोन वेळा अंतिम फेरी गाठलेल्या या संघाने सलामीला अॅटलेटीको दी कोलकाता (एटीके) विरुद्ध जोशात खेळ केला होता. कोलकात्यामध्ये त्यांनी प्रथमच विजय मिळविला. मुंबई सिटी एफसीविरुद्ध त्यांचा दुसरा विजय दृष्टिपक्षात आला होता, पण अखेरच्या क्षणी प्रांजल भुमीज याने गोल केल्यामुळे त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले.
ब्लास्टर्सचे प्रशिक्षक डेव्हिड जेम्स यांनी सांगितले की,” दिल्लीचा संघ कुतुहल निर्माण करणारा आहे. त्यांना संमिश्र खेळ करायला आवडते. आमच्याप्रमाणेच त्यांनी युवा खेळाडूंना संघात घेतले आहे आणि मला त्यांची ही गोष्ट आवडते. यास गुणवत्तेची जोड मिळाल्यास तुमचा संघ धोकादायक प्रतिस्पर्धी ठरतो. दिल्लीच्या संघात क्षमता आहे. आम्हाला योग्य दृष्टिकोन दाखविणे महत्त्वाचे असेल.”
भारताच्या 17 वर्षांखालील संघातील गोलरक्षक धीरज सिंग याने आतापर्यंत बचावाची 85.71 अशी सर्वोत्तम टक्केवारी प्रदर्शित केली आहे. तो खेळण्याची अपेक्षा आहे. संदेश झिंगन आणि नेमांजा लॅकिच-पेसिच यांनी बचाव फळीत भक्कम जोडी निर्माण केली आहे. यात महंमद रकीप आणि लालरुथ्थारा यांचाही समावेश आहे. झिंगन आणि कंपनी विरुद्ध आतापर्यंत एकच गोल झाला आहे. त्यामुळे दिल्लीसमोर ते खडतर आव्हान निर्माण करतील.
दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक मृदुल बॅनर्जी यांनी ब्लास्टर्सच्या बचावाची ताकद ठाऊक असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की,” ब्लास्टर्सचा संघ फार चांगला आहे. मी त्यांच्या संघातील काही खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. गेल्या दोन सामन्यांत त्यांनी चांगला खेळ केला आहे. त्यांचा बचाव भक्कम आहे. त्यांना सामोरे जाणे अवघड असले तरी आम्ही सर्वस्व पणास लावू.”
नवे प्रशिक्षक जोसेप गोम्बाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीने पहिले दोन सामने घरच्या मैदानावर खेळले. यातून त्यांना एकच गुण मिळाला, पण दोन्ही सामने जिंकता आले असते असे दिल्लीला वाटत असेल.
सलामीला पुणे सिटीविरुद्ध दिल्लीचा विजय नक्की वाटत होता, पण दिएगो कार्लोसने अंतिम टप्यात गोल केला. एटीकेविरुद्ध दिल्लीला 1-2 असा पराभव पत्करावा लागला. यात स्वैर फिनीशिंग आणि अंतिम टप्यातील गोल कारणीभूत ठरला.
बॅनर्जी यांनी सांगितले की, “आम्ही अंतिम टप्यात गोल पत्करावा लागण्याची कारणे शोधून काढू. आम्ही त्यादृष्टिने प्रयत्नशील आहोत. शक्य तेवढे कमी गोल पत्करावे लागतील म्हणून आमचा प्रयत्न आहे.”
लालीयनझुला छांगटे आणि नंदकुमार शेखर यांनी दोन्ही बाजूंनी जोशात खेळ केला आहे, पण स्ट्रायकर अँड्रीया क्लाऊडेरोविच याला लवकर फॉर्म गवसेल अशी आशा गोम्बाऊ यांना असेल.
दिल्लीच्या आघाडी फळीचे अचूकतेचे प्रमाण सर्वांत कमी 25 टक्के इतके आहे. ब्लास्टर्स घरच्या मैदानावर मोसमातील पहिल्या विजय मिळविण्याच्या निर्धाराने खेळेल.
दुसरीकडे गोम्बाऊ यांच्या दिल्लीला एकूणच मोसमातील पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे रंगतदार ठरणारी ही लढत पाहण्यासाठी चाहत्यांना सज्ज व्हावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–नेमार ज्युनियरने मोडला पेलेंचा हा विक्रम
–Video: या कामगिरीमुळे रोहित शर्माने पृथ्वी शॉला मिठीच मारली