जमशेदपूर: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) रविवारी येथील जेआरडी टाटा क्रीडा संकुलात जमशेदपूर एफसीची गतविजेत्या चेन्नईयीन एफसीविरुद्ध लढत होत आहे. त्यावेळी कामगिरीतील घसरण थांबवून विजयी मार्गावर परतण्याचा जमशेदपूरचा प्रयत्न राहील.
जमशेदपूर पाचव्या क्रमांकावर आहे, पण आठ सामन्यांत त्यांना केवळ दोन विजय मिळविता आले आहेत. त्यांच्यापेक्षा वरच्या क्रमांकावर असलेल्या संघांच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास निम्याने कमी आहे.
प्रशिक्षक सेझार फरांडो यांना एका गोष्टीपासून प्रेरणा घेता येईल आणि ती म्हणजे जमशेदपूरने एकच सामना गमावला आहे. दुसरीकडे सहभागी संघांमध्ये सर्वाधिक पाच बरोबरी जमशेदपूरने साधल्या आहेत. ही बाब काहीशी काळजीची आहे.
जमशेदपूरचा मार्की खेळाडू टीम कॅहील गेल्या आठवड्यात मायदेशात ऑस्ट्रेलियाला गेला होता. गौरवनिधी सामना खेळून तो परतला आहे. मागील सामना खेळू न शकलेला कॅहील आता ही लढत खेळू शकेल. यंदा तीन गोल केलेला सर्जीओ सिदोंचा दुखापतीमुळे स्पेनला परतला आहे, पण त्याच्या गैरहजेरीचा संघाने जास्त विचार करू नये असे फरांडो यांना वाटते.
फरांडो यांनी सांगितले की, सर्जिओला दुखापत झाली आहे. तो जानेवारीपर्यंत खेळू शकणार नाही. त्याच्या टाचेची दुखापत आमच्यासाठी मोठा धक्का आहे. तो नक्कीच चांगला खेळत होता, पण आता तो येथे नाही. आम्हाला खेळत राहावे लागेल आणि चांगले खेळावे लागेल.
सुमित पासी याने चांगला फॉर्म दाखविला आहे. मैदानावरील 334 मिनिटांच्या वास्तव्यात त्याने दोन केले आहेत. एफसी पुणे सिटीविरुद्धच्या लक्षवेधी कामगिरीनंतर सातत्य राखण्यास तो प्रयत्नशील असेल. लिगला तिसरा ब्रेक मिळण्यापूर्वी जमशेदपूर चार सामने खेळेल. यातील तीन सामने घरच्या मैदानावर खेळण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
दुसरीकडे चेन्नईयीन एफसीला गुणतक्त्यात आगेकूच करण्यासाठी अधिकाधिक गुण जिंकण्याची गरज आहे. सात सामन्यांतून केवळ नऊ गुणांसह हा संघ नवव्या क्रमांकावर आहे. मागील लढतीत पुण्याविरुद्ध कर्णधार मैल्सन आल्वेस याला फॉर्म मिळाला आणि त्यामुळे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी आनंदात आहेत. जेजे लालपेखलुआ याला सुद्धा लवकरच फॉर्म गवसेल अशी ग्रेगरी यांना आशा आहे. याचे कारण मिझोरामच्या या स्ट्रायकरला अद्याप खाते उघडता आलेले नाही.
अनिरुध थापा आणि जर्मनप्रीत सिंग यांनी जॉर्डनविरुद्ध कसून खेळ केला. त्यांना त्यांना जमशेदपूरविरुद्ध असेच खेळावे लागेल. या जोडीसमोर मारिओ आर्क्वेस आणि मेमो यांचे आव्हान असेल.
फ्रान्सिस फर्नांडीस याच्या उजवीकडून होणाऱ्या चाली यजमान संघासाठी काहीशी डोकेदुखी ठरू शकतात. त्याला मोकळीक मिळता कामा नये म्हणून जमशेदपूरला दक्ष राहावे लागेल.
ग्रेगरी यांनी सांगितले की, आम्ही गेल्या मोसमात येथे आलो तेव्हाच्या तुलनेत भक्कम नाही. जमशेदपूर कदाचित जास्त भक्कम आहे. आम्ही या सामन्याकडे गांभीर्याने पाहात आहोत.
जमशेदपूरला पुण्यात पराभूत व्हावे लागले. त्यानंतर आपले खेळाडू सावरून क्षमता दाखविणारा खेळ करतील अशी फरांडो यांची अपेक्षा आहे. दुसरीकडे ग्रेगरी यांना पुण्यावरील विजयानंतर पायाभरणीची अपेक्षा आहे. त्यामुळे ही लढत उत्कंठावर्धक ठरेल.








