जमशेदपूर| हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज (1डिसेंबर) जमशेदपूर एफसी आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी यांच्यात लढत होणार आहे. बाहेरच्या मैदानावर झालेल्या सामन्यांत अपराजित राहिलेला नॉर्थइस्ट आणि घरच्या मैदानावर अपराजित असलेला जमशेदपूर अशी ही लढत रंगेल. प्ले-ऑफमधील प्रवेशासाठी आणखी चुरस अपेक्षित असेल.
दोन्ही संघ भरात असल्यामुळे जे. आर. डी. टाटा संकुलातील लढत पर्वणी ठरेल. जमशेदपूर गुणतक्त्यात चौथा आहे. त्यांनी यंदा 18 गोल केले आहेत. दुसरीकडे नॉर्थइस्टने बेंगळुरूनंतर कमी गोल पत्करले आहेत. हा सुद्ध चुरस वाढविणारा मुद्दा आहे.
स्पेनचे सेझार फरांडो जमशेदपूरचे प्रशिक्षक आहेत. नॉर्थइस्टला नेदरलँड्सचे एल्को शात्तोरी मार्गदर्शन करतात. त्यांच्या कार्यपद्धतीतही लढत रंगेल. शात्तोरी यांनी सांगितले की, “जमशेदपूरने घरच्या मैदानावर आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे लढत उत्कंठावर्धक ठरेल. पहिली गोष्ट म्हणजे मला या क्लबला शाबासकी दिली पाहिजे. फुटबॉलाच खेळ त्यांचा श्वास आणि ध्यास आहे. मला येथील सुविधा खरोखरच आवडल्या आहेत. या संघाला चांगला, संघटित आणि शिस्तबद्ध खेळ करायला आवडतो. त्यांच्या संघाचे स्वरुप चांगले आहे. त्यांची मध्य फार फळी चांगली आहे. बचाव फळीत मला टिरी आवडतो.”
या दोन्ही संघांसाठी परदेशी खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. नॉर्थइस्टकरीता बार्थोलोम्यू ओगबेचे, जुआन मॅस्कीया व फेडेरिको गॅलोगो, तर जमशेदपूरसाठी मेमो, मारीओ आर्क्वेस, कार्लोस कॅल्वो यांनी उत्तम खेळ केला आहे. दोन्ही संघ एका परदेशी खेळाडूस मात्र मुकतील. जमशेदपूरच्या सर्जिओ सिंदोचा, तर नॉर्थइस्टच्या आगुस्टीन ओक्राह यांना दुखापत झाली आहे.
फरांडो यांनी सांगितले की, “नॉर्थइस्ट हा चांगला संघ आहे. ते छान खेळतात. मागील दोन सामने त्यांनी जिंकले आहेत, पण आमची तयारी नेहमीसारखीच असेल. आम्ही प्रत्येक सामन्यात करतो तेच करू. आम्ही त्यांना हरवू शकतो असे वाटते. चांगल्या खेळासाठी आम्हाला सांघिक कामगिरीची गरज असेल.”
सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा मायकेल सुसैराज याच्याकडे असेल. त्याने डाव्या बाजूने चमकदार कामगिरी करीत लक्ष वेधून घेतले आहे. गोल करण्याबरोबरच त्याने जमशेदपूरचे आक्रमण भेदक बनण्यात योगदान दिले आहे.
नॉर्थइस्टला गेल्या चार मोसमात डिसेंबरमध्ये केवळ दोन सामने जिंकता आले आहेत. आठ सामन्यांत पाच विजय मिळवून शात्तोरी यांच्या संघाने यावेळी घोडदौड केली आहे. नवा महिना विजयाने सुरु करता आला तर या मोसमात त्यांना रोखता येणे अवघड असेल. ओगबेचे त्यांच्यासाठी बहुमोल ठरतो आहे.
गोल्डन बुटच्या शर्यतीत ओगबेचेने एफसी गोवाच्या फेरॅन कोरोमीनास याला कडवी झुंज दिली आहे. त्याने कोरोच्या आठ गोलांच्या कामगिरीशी बरोबरी साधली आहे. जमशेदपूरमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करून आघाडी घेण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
आज जिंकल्यास नॉर्थइस्टला पहिल्या चार संघांमधील स्थान भक्कम करता येईल. त्यामुळे बाद फेरीच्या त्यांच्या आशा उंचावतील. फरांडो यांचे सुद्धा असेच लक्ष असेल. घरच्या मैदानावर सलग तिसरा विजय मिळविण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: स्वयंगोल केलेल्या भेकेचाच बेंगळुरूसाठी विजयी गोल
–हॉकी विश्वचषक २०१८: नवख्या चीनने इंग्लंडला बरोबरीत रोखले
–श्रीलंका संघात या दोन खेळाडूंचे झाले एक वर्षांनंतर पुनरागमन