कोची | केरळा ब्लास्टर्स आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात हिरो इंडियन सुपर लिगमध्ये शुक्रवारी गोलशून्य बरोबरी झाली. ब्लास्टर्सच्या करेज पेकूसन याने दुसऱ्या सत्रात पेनल्टी किकची सुवर्णसंधी दवडली, तर चेन्नईच्या ग्रेगरी नेल्सन याने भरपाई वेळेत मारलेला अप्रतिम फटका ब्लास्टर्सचा गोलरक्षक पॉल रॅचुब्का याने थोपविल्यानंतर थोडक्यात गोलपोस्टला लागला.
नेहरू स्टेडियमवरील या लढतीला ब्लास्टर्सचा सहमालक सचिन तेंडुलकर याच्यासह 31 हजार 259 प्रेक्षक उपस्थित होते. त्यांची निराशा झाली.
या बरोबरीमुळे ब्लास्टर्सच्या आशांना मोठा हादरा बसला. 17 सामन्यांतून त्यांना सातवी बरोबरी साधावी लागली. सहा विजय व चार पराभवांसह त्यांचे 25 गुण झाले. त्यांचे पाचवे स्थान कायम राहिला. त्यांचा एकच सामना बाकी आहे. चेन्नईने 17 सामन्यांतून पाचवी बरोबरी साधली.
आठ विजय व चार पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. 29 गुणांसह त्यांचे तिसरे स्थान कायम राहिले. बेंगळुरू एफसीने 34 गुणांसह आगेकूच नक्की केली आहे. पुणे 16 सामन्यांतून 29 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जमशेदपूर (16 सामन्यांतून 26) चौथे आहे.
दुसऱ्या सत्रात सातव्या आणि एकूण 52व्या मिनिटाला महत्त्वाचा क्षण आला. गुडजोन बाल्डव्हिन्सन याने जोरदार वेगाने घोडदौड केली. तो पेनल्टी क्षेत्रात मध्यभागी आला होता. त्याचवेळी जेरी लालरीनझुलाने त्याला पाडले. परिणामी पंचांनी ब्लास्टर्सला पेनल्टी किक बहाल केली. ती घेण्यासाठी करेज पेकुसन सज्ज झाला.
त्यावर पेकूसनने नेटच्या डाव्या कोपऱ्यात मैदानालगत फटका मारला, पण त्यात टायमिंगचा अभाव होताच. याशिवाय चेन्नईचा गोलरक्षक करणजीत सिंग याने अचूक अंदाज घेत झेप टाकून चेंडू अडविला.
पहिल्या सत्रात अंतिम टप्यात चेन्नईने दोन संधी घालविल्या. 41व्या मिनिटाला जेरी लालरीनझुला याने डावीकडून आगेकूच केली. त्याने रेने मिहेलीच याला बॉक्सपाशी पास दिला. रेने याने बिक्रमजीत सिंग याच्याकडे चेंडू दिला, पण बिक्रमजीतने मारलेला चेंडू नेटच्या डावीकडून बाहेर गेला.
45व्या मिनिटाला रेने मिहेलीच याने जेजे लालपेखलुआ याला पास दिला. तेव्हा जेजेला फार चांगली संधी होती, पण त्याने डाव्या पायाने मारलेला फटका स्वैर होता. त्यावेळी जेजेला निराशा लपविता आली नाही. तेव्हा चेन्नईचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी हे सुद्धा संतप्त झाले होते.
ब्लास्टर्सला सुद्धा काही संधी मिळाल्या. 13व्या मिनिटाला दिमीतार बेर्बातोव याने पेकूसनला पासदिला. पेकूसन याने 35 यार्ड अंतरावरून चेंडू ताकदीने मारला. करणजीतने थोपविलेला चेंडू सी. के. विनीत याच्या दिशेने गेला, पण विनीत संतुलन साधू शकला नाही.
त्यामुळे चेंडू त्याच्या पायाखालून गेला. 11व्या मिनिटाला जॅकीचंद सिंग याने उजव्या पायाने मारलेला चेंडू करणजीतने आरामात अडविला.
निकाल ः केरळा ब्लास्टर्स: 0 बरोबरी विरुद्ध चेन्नईयीन एफसी : 0