बेंगळुरू | केरळा ब्लास्टर्सची हिरो इंडियन सुपर लिगमध्ये गुरुवारी बेंगळुरू एफसीविरुद्ध लढत होत आहे. बाद फेरीच्या शर्यतीत असलेल्या ब्लास्टर्ससमोर श्री कांतीरवा स्टेडियमवर यजमान बेंगळरूचे कडवे आव्हान असेल.
ब्लास्टर्सला विजय अनिवार्य असेल. त्याचवेळी जमशेदपूर एफसी आणि एफसी गोवा हे संघ सुद्धा शर्यतीत असल्यामुळे विजानंतरही ब्लास्टर्सला प्रतिक्षा करावी लागू शकेल.
इतर निकाल आपल्या बाजूने लागण्याची अपेक्षा त्यांना बाळगावी लागेल. ब्लास्टर्स 17 सामन्यांतून 25 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. ते कमाल 28 गुणांपर्यंत मजल मारू शकतात.
त्याचवेळी जमशेदपूर (26) आणि गोवा (24) आणखी आगेकूच करणार नाही अशी आशा त्यांना बाळगावी लागेल.
बेंगळुरूने उपांत्य फेरीतील प्रवेश सर्वप्रथम नक्की केला आहे. बाद फेरीपूर्वी फॉर्म काम राखण्याच्या उद्देशाने ते खेळतील.
ब्लास्टर्सचे प्रशिक्षक डेव्हीड जेम्स म्हणाले की, आम्ही कठिण स्थितीत आहोत. जमशेदपूर आणि गोवा यांच्या कामगिरीवर आम्ही अवलंबून आहोत, पण आम्ही जिंकण्यासाठी सर्वस्व पणास लावू.
ब्लास्टर्सने पाच सामन्यांत अपराजित मालिका राखली आहे, पण यातील दोन बरोबरी जेम्स यांच्यासाठी निराशाजनक ठरल्या आहेत.
त्यात एक पराभव आणि एक विजय अशी कामगिरी झाली असती तर ते परवडले असते अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
जेम्स यांच्यासमोर आणखी एक पेच आहे. दिमीतार बेर्बातोव याला पसंती मिळाली तर कोणत्या ठिकाणी खेळवायचे हे त्यांना ठरवावे लागेल. जेम्स यांनी 1-0 असा विजय सुद्धा चालू शकेल असे भाष्य केले.
त्यावरून ब्लास्टर्स धडाकेबाज खेळ करणार नाही असे संकेत त्यांनी दिले. आपल्या संघासाठी गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू आणि कर्णधार सुनील छेत्री हे बेंगळुरूचे खेळाडू सर्वाधिक धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अल्बर्ट रोका यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा बेंगळुरू संघ दुसऱ्या क्रमांकावरील एफसी पुणे सिटीपेक्षा आठ गुणांनी पुढे आहे. बेंगळुरूने गेल्या सात पैकी सहा सामन्यांत विजय मिळविला आहे.
रोका म्हणाले की, हा साखळीतील शेवटचा सामना आहे, पण आम्हाला जिंकत राहणे महत्त्वाचे आहे. बाद फेरीत प्रवेश करताना आमचा खेळ भक्कम होणे आवश्यक आहे. त्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे आमचा खेळ शक्य तेवढा चांगला करावा लागेल.
बेंगळुरू आणि ब्लास्टर्स हे दक्षिणेतील प्रतिस्पर्धी कडवे लढवय्ये आहेत. मैदानावर अटीतटीच्या क्षणी चाहते मर्यादा ओलांडणार नाहीत अशी अपेक्षा दोन्ही प्रशिक्षकांनी व्यक्त केली.
रोका यांनी सांगितले की, भारतीय फुटबॉलसाठी अशी चुरस चांगली आहे. चाहत्यांनी योग्य प्रकारे याचा आनंद लुटावा.








