fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ISL 2018: कोचीत मुंबई सिटीसमोर ब्लास्टर्सचे तगडे आव्हान

कोची: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) मुंबई सिटी एफसीची शुक्रवारी येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर केरळा ब्लास्टर्सशी लढत होईल. सलामीला दमदार विजय नोंदविलेल्या ब्लास्टर्सचे तगडे आव्हान मुंबईसमोर असेल. मोसमात घरच्या मैदानावर पहिला सामना खेळताना ब्लास्टर्सचा आत्मविश्वास दुणावलेला असेल.

ब्लास्टर्सने कोलकत्यात माजी विजेत्या एटीकेला 2-0 असा धक्का दिला. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. स्ट्रायकर स्लाविसा स्टोजानोविच आणि मॅटेज पॉप्लॅटनिक यांनी हे गोल केले. ते मुंबईच्या बचाव फळीची सुद्धा कसोटी पाहतील. मुंबईला जमशेदपूरविरुद्ध दोन वेळ बचावातील त्रुटींचा फटका बसला.

ब्लास्टर्सचे प्रशिक्षक डेव्हिड जेम्स म्हणाले की, आमचे अनेक खेळाडू सरावात प्रभाव पाडत आहेत. त्यामुळे अंतिम संघातील स्थानासाठी अनेकांनी दावेदारी निर्माण केली आहे. संघातील सर्व खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असणे आणि खेळण्यास आतूर असणे प्रशिक्षकासाठी पेच निर्माण करते. एटीकेविरुद्ध गोल केलेल्या दोन खेळाडूंनी उत्तम खेळाचे प्रदर्शन घडविले. आम्ही आधीच्या लढतींच्या चित्रफिती पाहून बऱ्याच वेगळ्या खेळाडूंच्या मदतीने संधी निर्माण केल्या.

ब्लास्टर्सने गोल करण्याबरोबरच क्लीन शीट सुद्धा राखली. त्याविषयी जेम्स यानी बचावपटू नेमांजा लॅकिच-पेसिच याचे भरभरून कौतूक केले. ते म्हणाले की, अनास उपलब्ध नव्हता म्हणून नेमांजाने पुढाकार घेतला का याची मला खात्री नाही. तो संघातील स्थानासाठी योग्यता असलेल्या खेळाडूंपैकी एक आहे. सर्वांचा खेळ चांगला होणे प्रशिक्षकांसाठी सर्वोत्तम असते.

कोचीतील इतिहास मुंबईच्या जमेची बाब नाही. त्यांना येथे अद्याप आयएसएल सामना जिंकता आलेला नाही. चार सामन्यांत तीन बरोबरी आणि एक पराभव अशी त्यांची कामगिरी झाली आहे. मुंबईला घरच्या मैदानावर जमशेदपूर एफसीविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यातून सावरण्यासाठी मुंबई प्रयत्नशील असेल. बऱ्याच खेळाडूंचा खेळ अपेक्षेनुसार झाला नसल्यामुळे मुंबईचे प्रशिक्षक जोर्गे कोस्टा काही बदल करतील.

कोस्टा यांनी सांगितले की, जमशेदपूरविरुद्धच्या निकालावर मी आनंदी नाही. पूर्वार्धात आमच्यासाठी काहीच खास घडले नाही. दुसऱ्या सत्रात आम्ही बऱ्याच संधी निर्माण केल्या. शेवटची पाच मिनिटे मात्र धक्कादायक ठरली. अखेरीस आम्ही सामना आणि त्याबरोबरच तीन गुणही गमावले. कोचीत मी तीन गुण जिंकण्यासाठी आलो आहे.

सेहनाज सिंग तंदुरुस्त असण्याची अपेक्षा आहे, तर मिलान सिंग सुद्धा आपल्या आधीच्या संघाविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. देविंदर सिंग आणि अन्वर अली मात्र मुंबईसाठी उपलब्ध नसतील.

मुंबईचा आतापर्यंत एकच सामना झाला आहे, पण खाते उघडण्याचे दडपण संघावर असल्याचे कोस्टा यांनी मान्य केले. ते म्हणाले की, काही गुण मिळविण्याचे दडपण आमच्यावर उद्या असेल हे खरे आहे. याचे कारण ब्लास्टर्स घरच्या मैदानावर खेळत असेल आणि आधीचा सामना जिंकल्यामुळे पुन्हा विजय मिळविण्याचे दडपण त्यांच्यावर असेल.

You might also like