पुणे। हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एफसी पुणे सिटीची आज (२ नोव्हेंबर) केरळा ब्लास्टर्सविरुद्ध लढत होत आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील लढतीत विजय मिळवून घरच्या मैदानावर प्रतिक्षा संपुष्टात आणण्यासाठी पुणे प्रयत्नशील असेल. दुसरीकडे ब्लास्टर्सलाही तीन गुणांची गरज असेल.
पुणे सिटीने दिल्ली डायनामोजविरुद्ध बरोबरीने सुरवात केली. त्यानंतर त्यांना तीन सामने गमवावे लागले आहेत. यामुळे मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांनी प्रशिक्षकपद गमावले. हंगामी प्रशिक्षक प्रद्युम्न रेड्डी यांच्यावर संघाचे दैव पालटण्याची मदार आहे. संघाची गाडी रुळावर आणण्याच्या प्रयत्नातील पहिल्या टप्यात रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सिटी संघाला फॉर्मातील एफसी गोवा संघाकडून २-४ असा धक्का बसला. त्यातच दिएगो कार्लोस याला दुसऱ्या सत्रात लाल कार्डला सामोरे जावे लागले. त्यामुळे तो या लढतीला मुकेल.
रेड्डी यांनी सांगितले की, “आमची लीगमधील स्थिती बघता प्रत्येक सामन्यात विजय अनिवार्य आहे. जिंकल्यास तुम्ही गुणतक्त्यात लक्षणीय झेप घेता. सुदैवाने इतर संघांनी फार गुण मिळविलेले नाहीत. त्यामुळे आम्हाला थोड्या आशा आहेत.”
ब्लास्टर्सची स्थिती सुद्धा फार चांगली नाही. ते अपराजित असले तरी सलग तीन बरोबरींमुळे त्यांच्या बाद फेरीच्या आशेवर परिणाम झाला आहे. रेड्डी यांनी सांगितले की, “ब्लास्टर्सचा संघ अपराजित आहे, पण त्यांचा बचाव भेदणे अवघड असले तरी आम्ही काही डावपेच आखले आहेत.”
ब्लास्टर्सचा संघ मैदानावर तीन पेक्षा कमी गुण मिळवून परत येणार नाही हे प्रशिक्षक डेव्हिड जेम्स यांच्यासमोरील मुख्य आव्हान असेल. सलामीला एटीकेविरुद्ध बाजी मारल्यानंतर ब्लास्टर्सला तीन सामन्यांत विजय मिळविता आलेला नाही.
इंग्लंडचे माजी गोलरक्षक असलेले जेम्स म्हणाले की, “पुणे सिटीकडे काही प्रतिभासंपन्न खेळाडू आहेत. विशाल कैथ याच्या रुपाने त्यांच्यासमोर भारतामधील एक सर्वोत्तम गोलरक्षक आहे. त्यांच्या आघाडी फळीत बरीच क्षमता दिसून येते. त्यामुळे आम्हाला एकापेक्षा जास्त गोल करावे लागतील. आम्हाला जास्त गोल करणे महत्त्वाचे आहे आणि त्याचवेळी क्लीन शीट सुद्धा राखू अशी आशा आहे.”
गेल्या मोसमात ब्लास्टर्सने सर्वाधिक सात बरोबरी साधल्या. हा संघ गुणतक्त्यात सहाव्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे यंदा मोहीमेची अडखळत सुरवात झाल्यानंतर ब्लास्टर्सला बरोबरीचे विजयात रुपांतर लवकरात लवकर करण्याची गरज आहे. मार्सेलिनीयो आणि एमिलीयानो अल्फारो ही भेदक जोडी पुण्याचे मुख्य अस्त्र आहे, पण त्यांना गोलसमोर झगडावे लागले आहे. मागील सामन्यात अखेर दोघांनी मोसमातील वैयक्तिक पहिला गोल केला. त्यामुळे रेड्डी यांच्या संघाला पारडे फिरविण्यासाठी थोडा दिलासा मिळाला आहे.
ब्लास्टर्सच्या स्लावीसा स्टोयानोविच आणि मॅटेज पॉप्लॅटनिक या दोन्ही परदेशी स्ट्रायकर्सनी प्रभाव पाडला आहे. चार सामन्यांत दोघांनी मिळून तीन गोल केले आहेत. सी. के. विनीत याने दोन गोलांची भर घालत आतापर्यंत छाप पाडली आहे.
दोन्ही संघ विजयाशी कशाचीही तडजोड करणार नाहीत अशी ही लढत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–ISL 2018: कोरोच्या गैरहजेरीत जमशेदपूरकडून एफसी गोवा चीतपट
–तूम्ही जर रोहित फॅन असला तर ही आहे तुमच्यासाठी खास आकडेवारी
–धोनीवर आजपर्यंत अशी वेळ कधीच आली नव्हती