---Advertisement---

ISL 2019: एटीकेविरुद्ध आयएसएल पदार्पणात ठसा उमटविण्यास हैदराबाद सज्ज

On: शुक्रवार, ऑक्टोबर 25, 2019 10:53 AM
---Advertisement---

कोलकता | हैदराबाद एफसीची हिरो इंडियन सुपर लिग (आयएसएल) पदार्पणात शुक्रवारी येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर एटीकेविरुद्ध लढत होत आहे. त्यावेळी आयएसएलमधील नवा क्लब ठसा उटविण्यास सज्ज असेल.

एटीकेला रविवारी सलामीला केरला ब्लास्टर्सविरुद्ध पराभूत व्हावे लागले. त्यामुळे त्यांना विजयाची जास्त गरज आहे. एटीकेने सुरवात चांगली केली होती. कार्ल मॅक््ह्युजच्या गोलमुळे त्यांनी आघाडी घेतली होती. सुरुरावीताल ब्लास्टर्सला बचावातील चुका आणि नेटसमोरील ढिलाईचा किंमत मोजण्यास त्यांनी भाग पाडले होते. कोचीमध्ये आपला संघ हरण्याइतका खराब नव्हता असे प्रशिक्षक अँटोनिओ हबास यांना वाटते, पण हैदराबादविरुद्ध खेळात सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी मान्य केले.

ते म्हणाले की, आम्हाला संघामध्ये कदाचित जास्त संतुलनाची गरज असावी. आम्हाला खेळाडूंच्या साथीत सुधारणा करावी लागेल. आम्ही संघात नवे खेळाडू घेतले आहेत. नव्या संघासह परिपूर्ण संतुलन साधणे फार अवघड असते. आम्ही सलामीचा सामना हरण्याइतके खराब नव्हतो, पण आता आम्हाला पुढील सामन्याचा विचार करणे आवश्यक आहे.
स्टार स्ट्रायकर रॉय कृष्णा याला कोचीत आयएसएल खाते उघडण्याच्या काही चांगल्या संधी मिळाल्या होत्या. जावी हर्नांडेझ एटीकेसाठी आक्रमणात महत्त्वाचा मोहरा असेल.
त्यांना मायकेल सुसैराज याच्यासारखे खेळाडू चांगली साथ देण्याची अपेक्षा असेल.

नव्या संघाविरुद्ध घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठविण्यास एटीके आतूर असेल. हबास यांनी सांगितले की, आम्ही उद्या जिंकलेच पाहिजे असे मी मनात ठरविले आहे. आम्हाला प्रत्येक डावपेचात्मक गोष्टीचे कामगिरीत रुपांतर करावे लागेल. सामने जिंकण्यासाठी चांगला खेळ करण्याला महत्त्व आहे.

हैदराबाद एफसी नवा संघ असला तरी त्यांच्याकडे आयएसएलला  परिचीत असलेले बरेच चेहरे आहेत. यात मार्सेलिनीयो आणि मार्को स्टॅन्कोविच अशा स्टारचा समावेश आहे. ते सामना जिंकणारी कामगिरी करण्याच्या क्षमतेचे आहेत. अशा खेळाडूंमुळे हैदराबादचे प्रशिक्षक फिल ब्राऊन यांना मोसमाची सुरुवात चांगली करण्याचा आत्मविश्वास आहे.

ब्राऊन यांनी सांगितले की, पुणे सिटी एफसीमधील निम्म्याहून जास्त खेळाडू मी बरोबर आणले आहेत. याशिवाय मार्सेलिनियो आणि मार्को स्टॅन्कोविच अशा दोन परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मार्कोचे मनोधैर्य विलक्षण आहे. त्याला भारतीय फुटबॉलची चांगली जाण आहे. मार्सेलिनियो अशा प्रकारचा खेळाडू आहे की जो कुठेही खेळत असला तरी फुटबॉल सामने जिंकून देऊ शकतो.

हैदराबादकडे आक्रणात इतरही काही चांगले पर्याय आहेत. यात जमैकाचा गिलेस बार्न्स आणि ब्राझीलचा बोबो यांचा समावेश आहे. स्पेनचा मध्यरक्षक नेस्टर गॉर्डीलो मात्र डिेसेंबरपर्यंत उपलब्ध नसेल, कारण अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने त्याच्यावर बंदी घातली आहे.

ब्राऊन मात्र यामुळे विचलीत झालेले नाहीत आणि भरगच्च मोसमात क्लबसाठी सकारात्मक प्रारंभास आणि क्लबची ओळख निर्माण करण्यास उत्सूक आहेत.

ब्राऊन म्हणाले की, नव्या लीगमध्ये जाणारा नवा संघ तुमचा असेल तर आयएसएलचा ब्रँड म्हणून दर्जा वाढविण्यास योग्य प्रकारचा खेळ करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे असे मला वाटते. आयएसएलमध्ये दहा संघ आहेत, पण आम्हाला अद्याप ओळख नाही. आम्हाला ती मिळवावी लागेल. 11-12 दिवसांत आमचे चार सामने आहेत आणि तोपर्यंत प्रत्येकाला ओळख मिळालेली असेल.

ब्राऊन यांच्यातील प्रशिक्षकाच्या आत्मविश्वाचे रुपांतर त्यांचा संघ शुक्रवारी विजयात करणार का की एटीके निराशाजनक निकालातून सावरत घरच्या मैदानावर शैलीदार पुनरागमन करणार याची उत्सुकता असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---