---Advertisement---

विल्यम्सच्या गोलमुळे एटीकेची चेन्नईयीनवर मात

On: गुरूवार, ऑक्टोबर 31, 2019 5:17 PM
---Advertisement---

चेन्नई। हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) दोन वेळच्या माजी विजेत्या एटीकेने बुधवारी चेन्नईयीन एफसीवर एकमेव गोलने मात केली. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड विल्यम्स याने दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी केलेला गोल निर्णायक ठरला.

नेहरू स्टेडियमवरील लढतीत चेन्नईयीनच्या रॅफेल क्रिव्हेलारो, लालीयनझुला छांगटे, आदींनी केलेले उत्तरार्धातील प्रयत्न फसले. एटीकेचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याने आपल्या संघाचे नेट सुरक्षित राखले.एटीकेने तीन सामन्यांत दुसरा विजय मिळविला आहे. त्यांनी एक लढत गमावली. त्यांचे सहा गुण झाले. एटीकेने याबरोबरच आघाडी घेताना जमशेदपूर एफसीला सरस गोलफरकाच्या जोरावर मागे टाकले. एटीकेचा गोलफरक 5 (7-5), तर जमशेदपूरचा 3 (5-2) आहे.

चेन्नईयीनचा तीन सामन्यांत दुसरा पराभव झाला. त्याहून निराशेची बाब म्हणजे चेन्नईयीनला अद्याप एकही गोल करता आलेला नाही. मोसमात गोलांचे खाते उघडण्याची प्रतिक्षा असलेला चेन्नईयीन एकमेव संघ आहे. यामुळे जॉन ग्रेगरी यांच्यासमोरील समस्या घरच्या मैदानावरील पराभवानंतर आणखी वाढल्या आहेत. दुसरीकडे माजी विजेते प्रशिक्षक अँटोनिओ लोपेझ हबास यांचे पुनरागमन एटीकेसाठी फलदायी ठरू लागले आहे.

उत्तरार्धाच्या प्रारंभी एटीकेने खाते उघडले. 48व्या मिनिटाला आगुस्टीन इनीग्युएझने ही चाल रचली. त्याने उजवीकडून दिलेला अप्रतिम पास प्रबीर दासने टिपला. पेनल्टी क्षेत्रात मुसंडी मारत प्रबीरने जेव्हियर हर्नांडेझच्या दिशेने चेंडू मारला. चेन्नईयीनच्या ल्युचीयन गोएन याने हर्नांडेझला रोखले, पण एटीकेच्या सुदैवाने चेंडू विल्यम्सच्या पायापाशी गेला. मग विल्यम्सने उरलेले काम चोख बजावले.

दुसऱ्याच मिनिटाला एटीकेला मिळालेली फ्री किक जेव्हियर हर्नांडेझने घेतली. त्याने पेनल्टी क्षेत्रात मारलेला चेंडू चेन्नईयीनच्या धनपाल गणेशने उडी घेत हेडिंग करून गोलरक्षकाकडे सोपविला. पुढच्याच मिनिटाला चेन्नईयीनला संधी होती. ड्रॅगोस फर्तुलेस्क्यूने उजवीकडून एडविन वॅन्सपॉलला पास दिला. त्या चालीतून नेरीयूस वॅल्सकीसने उडी घेत हेडिंग केले, पण चेंडू बारवरून बाहेर गेला.

सातव्या मिनिटाला हर्नांडेझ व रॉय कृष्णाने चाल रचली, पण चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथने ती रोखली. दोन मिनिटांनी चेन्नईयीनला अप्रतिम संधी मिळाली होती. मध्य क्षेत्रात ल्युचीयनने चेंडूवर ताबा मिळवित रॅफेल क्रीव्हेलारोला पास दिला. डावीकडून रॅफेलने वॅल्सकीसला चेंडू दिला. वॅल्सकीसने मैदानावर घसरत चेंडू नेटच्या दिशेने मारला, पण त्यात अचूकता नव्हती. त्यावेळी फर्तुलेस्क्यू यालाही संधी होती, पण त प्रसंगावधान दाखवू शकला नाही.

एटीकेने 12व्या मिनिटाला आणखी एक प्रयत्न केला. हर्नांडेझने डावीकडून कॉर्नरवर मारलेला चेंडू विल्यम्स आणि रॉय कृष्णा यांच्या दिशेने गेला. दोघांनी प्रयत्न केला, पण कैथने त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण केला. परिणामी चेंडू ल्युचीयनच्या पायापाशी गेला.

दोन मिनिटांनी वॅल्सकीसने कृष्णाला पेनल्टी क्षेत्रात पाडले. त्यावेळी एटीकेचे पेनल्टी अपील पंच रक्तीम साहा यांनी फेटाळून लावले. 16व्या मिनिटाला अनिरुध थापाने डावीकडून पास दिल्यावर लालीयनझुला छांगटेने मारलेला चेंडू थेट एटीकेचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याच्या हातात गेला.

22व्या मिनिटाला चेन्नईयीनला ढिलाई भोवली असती. ल्युचीयनने कैथच्या दिशेने चेंडू मारला. कैथ पहिल्या प्रयत्नात किक मारताना चुकला. त्यावेळी कृष्णा आणखी जवळ असता तर तो आरामात गोल करू शकला असता. पूर्वार्धात मायकेल सुसैराजने मारलेला चेंडू ल्युचीयनने 24व्या मिनिटाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू त्याच्या अंगाला घासून हाताला लागला. एटीकेने पेनल्टीचे अपील केले, पण ते अमान्य झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---