गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमातील महत्त्वाच्या लढतीत एटीके मोहन बागानने बेंगळुरू एफसीला 1-0 असे हरवले. याबरोबरच माजी विजेत्या बेंगळुरूची अपराजित घोडदौड खंडित झाली. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर आघाडी फळीतील ऑस्ट्रेलियाच्या 32 वर्षीय डेव्हिड विल्यम्स याने केलेला गोल एटीकेएमबीसाठी निर्णायक ठरला.
सहभागी 11 संघांमध्ये केवळ बेंगळुरू अपराजित होता, पण स्पेनच्या कार्लेस कुआद्रात यांच्या संघाला यंदा मैदानावरून प्रथमच रिकाम्या हातांनी माघारी जावे लागले. स्पेनच्या अँटोनिओ लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या एटीकेएमबीने आधीच्या सामन्यात एफसी गोवा संघाला हरवले होते. यावेळी आणखी एका तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याला हरवताना एटीकेएमबीने तीन गुणांची कमाई केली आणि संभाव्य विजेत्यांच्या शर्यतीमधील स्थान भक्कम केले.
एटीकेएमबीने सात सामन्यांत पाचवा विजय नोंदवला असून एक बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 16 गुण झाले. मुंबई सिटी एफसीला त्यांनी गुणांवर गाठले, पण मुंबई सिटीचा 8 (11-3) असा गोलफरक एटीकेएमबीच्या 5 (8-3) पेक्षा सरस आहे. त्यामुळे मुंबई सिटीचे गुणतक्त्यातील अग्रस्थान कायम राहिले.
बेंगळुरूला सात सामन्यांत पहिलीच हार पत्करावी लागली. तीन विजय व तीन बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 12 गुण व तिसरे स्थान कायम राहिले. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी सात सामन्यांतून दहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
दुसऱ्याच मिनिटाला एटीकेएमबीने प्रयत्न केला. कर्णधार कृष्णाने गोलक्षेत्राबाहेर चेंडू मिळताच मध्यरक्षक एदू गार्सिया याला पास देण्यासाठी प्रतिस्पर्धी बचावपटूच्या डोक्यावरून चेंडू मारला, पण गुरप्रीतने पुढे येत चेंडू हातात झेलला. बेंगळुरूने कृष्णाचा धोका आधीच ओळखला होता. त्यामुळे पाचव्या मिनिटाला उजवीकडून आगेकूच करणाऱ्या कृष्णाला बेंगळुरूचा बचावपटू जुआनन याने पाडले. त्यामुळे रेफरी सी. रामास्वामी श्रीकृष्ण यांनी जुआनन याला यलो कार्ड दाखवले.
पुढील मिनिटाला गार्सियाने फ्री किकवर गोलक्षेत्रात मारलेला चेंडू विल्यम्सपाशी आला. विल्यम्सने हेडिंग केले, पण तोच ऑफसाईडचा इशारा झाला.
अकराव्या मिनिटाला एटीकेएमबीचा स्ट्रायकर मानवीर सिंगने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवला आणि डावीकडे कृष्णाला पास दिला. त्यावेळी धावत येणाऱ्या गार्सियाचा अंदाज घेत कृष्णाने त्याला पास दिला. त्याचा प्रयत्न बेंगळुरुचा बचावपटू राहुल भेकेने रोखला.
पुढे 22व्या मिनिटाला एटीकेएमबीचा बचावपटू शुभाशिष बोस याने डावीकडून मानवीरच्या दिशेने चेंडू मारला. राहुल भेकेला चकवत मानवीरने चेंडूवर ताबा मिळवला, पण त्याने मारलेला फटका गुरप्रीतने अडवला.
सामन्यातील पहिला कॉर्नर बेंगळुरूला 26व्या मिनिटाला मिळाला. देशोर्न ब्राऊन याने गोलक्षेत्रात उजवीकडे चेंडू मिळताच प्रयत्न केला, पण एटीकेएमबीच्या संदेश झिंगन याने त्याला रोखले व चेंडू बाहेर घालवला. त्यामुळे बेंगळुरूला पुन्हा कॉर्नर मिळाला. यावेळी क्लेईटन सिल्वाने घेतलेल्या कॉर्नरवर यावेळीही संदेशने हेडिंगवर बचाव केला.
विल्यम्सने दुसऱ्या सत्रातही बेंगळुरूच्या क्षेत्रात धडका मारल्या. डावीकडे चेंडू मिळताच त्याने कृष्णाला क्रॉस पास देण्याचा प्रयत्न केला, पण गुरप्रीतने पुढे सरसावत चेंडू अडवला.
तसेच 73व्या मिनिटाला बेंगळुरूला सर्वोत्तम संधी मिळाली होती. मध्य क्षेत्रातून क्लेईटन सिल्वाने उजवीकडे चेंडू मारला. बदली मध्यरक्षक सुरेश वांगजाम याने सिल्वाकडे चेंडू परत देताना चपळाई दाखवली. तोपर्यंत आगेकूच करीत सिल्वाने जवळून फटका मारला, पण तो स्वैर होता.
तीन मिनिटांनी एटीकेएमबीचा मध्यरक्षक जयेश राणेने उजवीकडे मानवीरला पास दिला. मानवीरने मारलेला चेंडू गुरप्रीतने पायांनी थोपवला. त्यातून एटीकेएमबीला कॉर्नर मिळाला, पण त्यावर काही घडले नाही.