भारतीय फुटबॉलमधील आजघडीचा एक मोठा खेळाडू संदेश झिंगान याने एक आश्चर्यकारक अशी गोष्ट सांगितली. प्रत्यक्ष स्टेडियमवर उपस्थित राहून एकदाही कोलकाता डर्बीचा थरार लुटू शकलेलो नाही, असे त्याने सांगितले.
शुक्रवारी मात्र त्याला ही संधी मिळेल. केवळ स्टेडियमवर असण्याशिवाय तो आणखी बरेच काही करू शकेल. एटीके मोहन बागान आणि एससी ईस्ट बंगाल सातव्या हिरो इंडियन सुपर लिगमधील पहिल्यावहिल्या कोलकाता डर्बीसाठी आमनेसामने येतील तेव्हा झिंगान मैदानावरील ऍक्शनच्या केंद्रस्थानी असेल.
झिंगानने सहा मोसम केरला ब्लास्टर्सचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्याने या मोसमाच्या प्रारंभी मोठा निर्णय घेतला. कोचीस्थित ब्लास्टर्सचा त्याने निरोप घेतला. नव्याने स्थापन झालेल्या एटीकेएमबी कडे त्याने प्रस्थान केले. या संघाशी तो पाच वर्षांसाठी करारबद्ध झाला आहे. प्रशिक्षक अँटोनिओ लोपेझ हबास यांनी या भक्कम बांध्याच्या 27 वर्षीय बचावपटूची क्षमता क्षणात हेरली आणि संघाच्या पाच कर्णधारांमध्ये त्याचा तत्परतेने समावेश केला.
आता नव्या संघाकडून केवळ दुसऱ्या सामन्यात त्याला डर्बीचा थरार लुटता येईल. झिंगान मात्र नेहमीसारखाच एक सामना या दृष्टिकोनाने बघतो आहे. त्याने सांगितले की, “जगातील हा एक फार मोठ्या प्रतिष्ठेचा सामना आहे. एक फुटबॉलपटू म्हणून भव्य व्यासपीठावर अशा लढतींचा घटक बनण्याची तुमची महत्त्वाकांक्षा असते. त्यामुळे मी उत्सूक आहे. सामन्याच्या भव्यतेची तीव्रता किती आहे याचा मी फार खोलवर जाऊन विचार करीत नाही. कोलकाता डर्बी असो किंवा इतर कोणताही सामना, दोन्ही सारखेच असतात. सर्वच सामने महत्त्वाचे असतात. त्यामुळे मी भावनांना अकारण अवास्तव ताबा घेऊ देत नाही. प्रशिक्षक आणि संघाच्या कार्यदलाचा दृष्टिकोन सुद्धा असाच आहे.”
दोन्ही क्लबच्या चाहत्यांसाठी या लढतीचे महत्त्व झिंगान याला ठाऊक नाही असे नाही, पण आपला संघ तीन गुणांची कमाई करून मैदानावरून बाहेर पडेल यावरच त्याने लक्ष केंद्रित केले आहे. त्याने सांगितले की, “डर्बीचा इतिहास प्रदीर्घ आहे आणि त्याची पाळेमुळे भारतीय फुटबॉ़लमध्ये खोलवर रुजली आहेत. आता याचा एक घटक बनण्याची संधी मला मिळेल अशी आशा आहे. भारतीय फुटबॉल आणि चाहत्यांसाठी कोलकता डर्बी चांगली आहे, पण आम्ही वर्तमानकाळात राहतो आणि मला माझ्याकडून अपेक्षित असलेली कामगिरी पूर्ण करावी लागेल. संघातील इतर खेळाडूंप्रमाणेच तीन गुण मिळविणे आणि एकही गोल न पत्करणे अशी ही कामगिरी आहे, जी संघाला करून दाखवावी लागेल.”
मोठे सामने या सेंटरबॅकला अपरिचीत नाहीत. राष्ट्रीय संघाकडून अनेक महत्त्वाचे सामने खेळण्याशिवाय तो आयएसएलच्या अंतिम सामन्यांत दोन वेळा सहभागी झाला आहे. दडपणाला सामोरे जाणे ही त्याच्यासाठी कधीच समस्या ठरलेली नाही. त्यामुळे कोलकाता डर्बीसाठी वेगळी ठरेल अशी त्याची अपेक्षा नाही. तो म्हणाला की, “एका विजेत्या संघात असण्यामुळे अतिरिक्त दडपण येते, पण मी जबाबदारी पेलण्याचा आनंद लुटतो. याचे कारण तुमच्यामध्ये काहीतरी क्षमता आहे आणि म्हणून ती तुमच्यावर सोपविण्यात आलेली असते. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी अपेक्षित अशी कामगिरी तुम्ही करण्याची अपेक्षा लोकांनी बाळगलेली असते.”
एटीकेएमबीने मोहिमेचा प्रारंभ विजयाने केला आहे. ब्लास्टर्सवर त्यांनी 1-0 असा निसटता विजय मिळविला. ईस्ट बंगालमध्ये आणखी बरेच काही पणास लागलेले असेल. लिव्हरपूरलचा दिग्गज खेळाडू रॉबी फाऊलवर याच्याकडे नेतृत्व असलेला क्लब या लढतीने आपली मोहिम सुरु करणार आहे.
लाल आणि सोनेरी रंगाची जर्सी घालणाऱ्या या संघाने मोसमासाठी समुळ फेरबदल केले. अनुभवी भारतीय खेळाडूंच्या जोडीला नामवंत परदेशी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. लीगमधील मातब्बर संघ म्हणून आपले अस्तित्व निर्माण करण्यास कोणताही वेळ दवडायचा नाही अशा निर्धाराने मैदानावर उतरण्यास ते सज्ज झाले आहेत. गतविजेत्या एटीकेएमबीचा संघ भक्कम, सखोल आहे आणि त्यांचे पारडे जड असेल. फाऊलरच्या संघाच्या कामगिरीचा अंदाज बांधणे अवघड असेल, याचे कारण त्यांनी अद्याप एकही सामना खेळलेला नाही, असे झिंगानला वाटते.
तो म्हणाला की, “आमचा संघ स्थिरावला आहे. त्यामुळे त्यांना आमच्या अनुकूल-प्रतिकूल बाबींची कल्पना आली असेल. त्यांचा संघ नवा आहे आणि त्यांच्या कामगिरीचा अंदाज घेणे अवघड आहे. ते कोणत्या प्रकारचे आव्हान निर्माण करतील हे आम्हाला ठाऊक नाही. आमच्यावर जबाबदाऱ्या आहेत आणि आमची पद्धत तसेच आमच्या प्रशिक्षकांवर आमचा विश्वास आहे. प्रशिक्षकांनी या लढतीसाठी अचूक योजना आखलेली असेल याची मला खात्री आहे.”