कोची, २९ जानेवारी : केरळा ब्लास्टर्सने हिरो इंडियन सुपर लीगमध्ये २०२२-२३ ( आयएसएल) रविवारी झालेल्या सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीवर २-० असा विजय मिळवला. दिमित्रिऑस डिएमांटाकोसने पहिल्या हाफच्या अखेरच्या काही मिनिटांत केलेले दोन्ही गोल निर्णायक ठरले. या विजयासह केरळा ब्लास्टर्सने सलग दोन सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित केली अन् पुन्हा तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.
केरळा ब्लास्टर्सला सलग दोन पराभव पत्करावे लागले आहेत आणि घरच्या मैदानवार हिरो आयएसएलमधील ही मालिका तोडण्याच्या निर्धाराने केरळाचा संघ मैदानावर उतरला. पण, नॉर्थ ईस्ट युनायटेड त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज होता. नॉर्थ ईस्टची बचाव भिंत भेदताना केरळा ब्लास्टर्सच्या खेळाडूंचा चांगलाच घाम गळला. १५व्या मिनिटाला अपोस्टोलोस गिआनूने गोल करण्याची सोपी संधी गमावली. १७ व्या मिनिटाला पोस्ट समोरून आणखी एक संधी गमावली. नॉर्थ ईस्टचा बचाव उल्लेखनीय झालेला पाहायला मिळाला. केरळा ब्लास्टर्सचे खेळाडू गोल करण्यासाठी झगडत होते. ३१व्या मिनिटाला दिमित्रिऑस डिएमांटाकोसचा प्रयत्न ऑफ टार्गेट राहिला. पण, ४२ ते ४४ या दोन मिनिटांत डिएमांटाकोसने दोन गोल केले. ४२व्या मिनिटाला ब्रुयसे मिरांडा आणि ४४व्या मिनिटाला एड्रियन लुनाच्या पासवर डिएमांटाकोसने हे गोल केले अन् केरळा ब्लास्टर्सने २-० अशी आघाडी घेतली. नॉर्थ ईस्टच्या कुले एमबोम्बोले गोल करण्याची सोपी संधी गमावली.
दुसऱ्या हाफ मध्ये डिएमांटाकोसचा दबदबा पाहायला मिळाला. ४९व्या मिनिटाला त्याची गोल हॅटट्रिक थोडक्यात हुकली. केरळा ब्लास्टर्स ही आघाडी वाढवण्याचे सातत्याने प्रयत्न करताना दिसले, तेच दुसरीकडे नॉर्थ ईस्ट युनायटेडच्या खेळाडूंमध्येच ताळमेळ नसल्याचे पाहायला मिळत होते. ६४व्या मिनिटाला गिआनूचा प्रयत्न नॉर्थ ईस्टच्या आरोन इव्हान्सने ब्लॉक केला, परंतु चेंडू राहुल केपीकडे गेला. केपीने ऑन टार्गेट मारलेला चेंडू गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्यने रोखला. ६७व्या मिनिटाला गिआनूचा व्हॉली द्वारे प्रयत्न गोलपोस्टच्या बाजूने गेला. ७७व्या मिनिटाला नॉर्थ ईस्टने गोल करण्याची सोपी संधी गमावली. प्रतिभ गोगोईच्या क्रॉसवर रोमेन फिलिपोटूक्सला गोलपोस्टच्या समोरून गोल करता आला असता, परंतु त्याने घाई केली अन् चेंडू पोस्टच्या बाजूने गेला. नॉर्थ ईस्ट युनायटेडने संधी गमावल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. केरळा ब्लास्टर्सने विजय मिळवताना तालिकेत २८ गुणांसह पुन्हा तिसरे स्थान पटकावले.
निकाल : केरळा ब्लास्टर्स २ ( दिमित्रिऑस डिएमांटाकोस ४२ मि. व ४४ मि. ) विजयी वि. नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी ०
(ISL Kerala Blasters beat North East United FC)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला क्रिकेटपटू पार्श्वीने पहिल्या प्रेमासाठी केला त्याग; क्रिकेटर नव्हे तर…
कट्टर दोस्त क्रिकेटर पुढे जाऊन झाले एकमेकांचे कट्टर दुश्मन, आज पाहत नाहीत एकमेकांचे तोंड