---Advertisement---

‘हा’ इंग्लिश स्ट्रायकर झाला‌ केरळा ब्लास्टर्सच्या ताफ्यात दाखल

On: गुरूवार, ऑक्टोबर 8, 2020 8:11 AM
---Advertisement---

केरळ ब्लास्टर्स एफसीने इंडियन सुपर लीगच्या आगामी हंगामापूर्वी इंग्लिश स्ट्रायकर गॅरी हूपर याला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. ३२ वर्षीय हूपर आयएसएल खेळणार आहे, याची चर्चा गेले काही दिवस होत होती. मात्र, तो कोणत्या संघाकडून सहभागी होईल याविषयी साशंकता निर्माण झालेली. आता, अखेरीस केरळा ब्लास्टर्सशी करार केल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. हूपर मार्चमध्ये आयएसएलचा हंगाम संपेपर्यंत ब्लास्टर्ससाठी खेळेल.

हूपरने टॉटेनहॅम हॉटस्परच्या युवा संघासह फुटबॉल खेळायला सुरुवात केली होती. पुढे युरोपमध्ये फुटबॉलच्या विविध स्तरावर सेल्टिक, नॉर्विक सिटी आणि शेफील्ड वेन्सडे या संघांसोबत खेळल्यानंतर आता त्याने, केरळा ब्लास्टर्ससाठी खेळण्यासाठी करार केला आहे. युएफए चॅम्पियन्स लीग आणि युरोपा लीगमध्येही त्याने आपली कौशल्ये दाखवले आहेत. हूपरने सेल्टिक क्लबसोबत स्कॉटिश लीग देखील जिंकली होती.

हूपरने २०१३-१४ च्या हंगामात प्रीमियर लीगमध्ये नॉर्विक सिटी एफसीकडून खेळला होता. त्यावर्षी तो नॉर्विक सिटीसाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता.

हूपर सोबतच्या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर, केरळा ब्लास्टर्सचे स्पोर्टिंग डायरेक्टर, कॅरोलिस स्किन्कीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “गॅरीची मैदानावरील उपस्थिती प्रेरणादायी ठरेल. आम्ही त्याचे काही अविश्वसनीय गोल पाहण्यासाठी आतुर आहोत. मला आशा आहे की, ब्लास्टर्सचे चाहते गॅरीलाही तितकेच प्रेम देतील. गॅरीसारख्या दर्जेदार खेळाडूचा संघात समावेश झाल्याने मला आनंद होत आहे आणि आगामी हंगामात त्याच्याबरोबर काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

फाकुंडो पेरेरा आणि विसेन्ते गोमेझ यांच्यानंतर केरळा ब्लास्टर्सशी करार करणारा तिसरा विदेशी खेळाडू ठरलेल्या हूपरकडून, गेल्या वर्षीचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बार्थोलोम्यू ओगबेचेची उणीव भरून काढण्याची अपेक्षा आहे.

हूपरने ब्लास्टर्ससोबत जोडले गेल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, “मी केरळा ब्लास्टर्सबरोबर कारकीर्दीतील पुढील अध्यायाची सुरुवात करत आहे. माझ्या अनुभवाचा संघास फायदा करून देण्याचा मी प्रयत्न करेल. ब्लास्टर्सला आयएसएल विजेतेपद मिळवून देणे आता माझे ध्येय आहे. माझ्या नव्या सहकाऱ्यांची भेट घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

आयएसएलचा पुढील हंगाम डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, केरळा ब्लास्टर्स गोव्यामध्ये आपले सराव शिबिर आयोजित करू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---