गोवा, १६ फेब्रुवारी : आयएसएल अर्थात हिरो इंडियन सुपर लीगच्या आठव्या हंगामातील ‘प्ले-ऑफ’ फेरीसाठी प्रचंड स्पर्धा असून गतविजेता मुंबई सिटी एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यातील गुरुवारच्या (१७ फेब्रुवारी) लढतीला ‘सेमीफायनल’च्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे.
आठव्या हंगामातील गुणतालिकेत जमशेदपूर आणि मुंबई सिटी अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. दोन्ही क्लबचे समान २५ गुण असले तरी गतविजेत्यांच्या तुलनेत जमशेदपूरने एक सामना कमी खेळला आहे. उभय संघांमधील विजेता संघ तिसऱ्या स्थानासाठी दावेदारी पेश करेल. तसेच पहिल्या दोन स्थानी असलेल्या हैदराबाद एफसी आणि एटीके मोहन बागान क्लबमधील (प्रत्येकी २९ धावा) अंतर कमी करतील.
मुंबई सिटीने मागील चार सामन्यांत अपराजित मालिका कायम राखली आहे. दोन बरोबरींनंतर सलग दोन विजय मिळवलेत. चेन्नईयन एफसीवरील निसटत्या विजयानंतर ओदिशा एफसीला मोठ्या फरकाने हरवले. आता त्यांना सलग तिसऱ्या विजयाची संधी चालून आली आहे. बिपीन सिंगला गवसलेला सूर मुंबई सिटीसाठी जमेची बाजू ठरली आहे. ओदिशाविरुद्धच्या विजयात एक गोल करताना त्याने एक असिस्ट केला आहे. मोरोक्कोचा मिडफिल्डर अहमद जाहू यानेही गोल करण्यात कमालीचे सातत्य राखले आहे. त्याच्यासमोर आयएसएलमधील सर्वाधिक गोल असिस्ट करण्याचा विक्रम दृष्टिक्षेपात आहे. जाहूने यंदाच्या हंगामात सात गोल करण्यात मदत केली. सर्वात जास्त गोल असिस्ट करण्यात कुफो इसॅको आरनॉल्ड (२०१८-१९) आघाडीवर आहे.
आम्ही सलग चार सामन्यांत अपराजित आहोत. दुसऱ्या टप्प्यात आम्ही खेळ उंचावला आहे. मात्र, सातत्य राखण्याचे आव्हान आहे. यावेळचा प्रतिस्पर्धी कडवा आणि मजबूत आहे. त्यामुळे सर्वच आघाड्यांवर आम्हाला खेळ उंचवावा लागेल, असे मुंबई सिटी एफसीचे मुख्य प्रशिक्षक डेस बकिंगहॅम यांनी सांगितले. मागील लढतीत दिएगो मॉरिसिओविना मुंबई सिटी एफसीला खेळावे लागले. मात्र, जमशेदपूरविरुद्ध तो उपलब्ध असेल, असे बकिंगहॅम यांनी पुढे म्हटले.
मुंबई सिटी एफसीप्रमाणेच जमशेदपूर एफसीही फॉर्मात आहे. केरला ब्लास्टर्सवर ३-० असा मोठा विजय मिळवत त्यांनी दमदार पुनरागमन केले. त्यांची भिस्त डॅनियल चिमा चुक्वुवर आहे. त्याने मागील तिन्ही सामन्यांत गोल करताना कमालीचे सातत्य राखले आहे. स्टीवर्टचे कमबॅकही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते. केरला ब्लास्टर्सविरुद्ध दोन गोल करताना स्टीवर्टने मागील पाच सामन्यांतील ‘गोललेस’ मालिका संपुष्टात आणली.
आठव्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबई सिटी एफसीने जमशेदपूर एफसीवर ४-२ अशा फरकाने मात केली. गतविजेते त्यात सातत्य राखण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे, जमशेदपूर पराभवाचा बदला घेण्यास उत्सुक आहे.