जमशेदपूर। गतविजेत्या बेंगळुरू एफसीला हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमात सलग तिसरी बरोबरी पत्करावी लागली. रविवारी जमशेदपूर एफसीविरुद्ध त्यांना जेआरडी टाटा क्रीडा संकुलाच्या मैदानावर एकच गुण मिळविता आला. बेंगळूरूप्रमाणेच जमशेदपूरलाही चांगल्या चालींचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. त्याचवेळी जमशेदपूरचा सुब्रत पॉल आणि बेंगळुरूचा गुरप्रीत सिंग संधू यांची कामगिरीही लक्षवेधी ठरली.
पूर्वार्धाच्या प्रारंभी बेंगळुरूने अथक चाली केल्या, तर जमशेदपूरनेही उल्लेखनीय प्रयत्न केले. जमशेदपूरची ही पहिलीच बरोबरी आहे. आधीचे दोन सामने त्यांनी जिंकले होते. त्यांनी तीन सामन्यांतून सात गुणांसह आघाडी घेतली. एटीकेला त्यांनी मागे टाकले. एटीकेचे तीन सामन्यांतून सहा गुण आहेत. बेंगळुरू सातव्या क्रमांकावर आहे. तीन सामन्यांतून तेवढेच गुण त्यांच्या खात्यात जमा आहेत. बेंगळुरूने गेल्या मोसमात 18 पैकी चार सामने बरोबरीत सोडविले होते, तर त्याआधी त्यांना पदार्पणात केवळ एकदा बरोबरी पत्करावी लागली होती. यावेळी कार्लेस कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुनील छेत्रीच्या कर्णधारपदाखाली गतविजेत्यांना अपेक्षित प्रारंभ करता आलेला नाही. त्यांची निर्णायक विजयाची प्रतिक्षा लांबणे चाहत्यांसाठीही निराशाजनक ठरले आहे.
तिसऱ्याच मिनिटाला जमशेदपूरच्या अनिकेत जाधवने निशू कुमारला रोखले. त्यावेळी थ्रोइन रोखण्याचा त्याचा प्रयत्न होता. बेंगळुरूचा कर्णधार सुनील छेत्रीने सातव्या मिनिटाला जोरदार प्रयत्न केला. रॅफेल आगुस्टोने मध्य रेषेलगत चेंडूवर ताबा मिळवून छेत्रीला पास दिला. छेत्रीने डाव्या पायाने मारलेला ताकदवान फटका मात्र जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉलने रोखला.
त्याच मिनिटाला जमशेदपूरने प्रतिआक्रमण रचले. मध्य क्षेत्रात चेंडू मिळताच सर्जिओ कॅस्टेलने आगेकूच केली. बेंगळुरूची बचाव फळी त्याला रोखू शकली नाही. कॅस्टेलने मारलेला फटका रोखणे बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू याच्या आवाक्याबाहेर होते, पण यजमान संघाच्या दुर्दैवाने चेंडू डाव्या पोलला लागला.
बेंगळुरूने पुढील काही मिनिटांत अथक चाली रचल्या, पण त्यास फिनीशिंगची जोड मिळू शकली नाही. आगुस्टोने नेटच्या दिशेने मारलेला चेंडू मेमो मौराच्या अंगाला लागून बाहेर गेला. त्यामुळे मिळालेला कॉर्नर डिमास डेल्गाडोने घेतला. त्याने किक मारताच सुब्रत पुढे सरसावला आणि त्याने चेंडू थोपविला, जो हरमनज्योत खाब्रापाशी गेला. खाब्राने उजवीकडील उदांता सिंगला पास दिला. उदांताचा क्रॉस येत असताना जमशेदपूरने जुआननसाठी ऑफसाईडचा सापळा लावण्याचा प्रयत्न केला. तो भेदत जुआननने मोकळीक मिळविली, पण त्याने हेडींग केलेला चेंडू थेट सुब्रत पॉलच्या हातात गेला.
बेंगळूरूने 14व्या मिनिटाला आणखी एक प्रयत्न केला. राहुल भेकेने उजवीकडून चेंडूवर ताबा मिळविला आणि परिपूर्ण क्रॉस पास दिला. त्यावर उडी घेत आगुस्टोने हेडिंग केले, पण ते थोडक्यात चुकले.
सहा मिनिटांनी सुब्रत पॉलने आपली चपळाई पुन्हा प्रदर्शित केली. डेल्गाडोने घेतलेल्या कॉर्नरवर जुआनन याने नेटच्या दिशेने हेडींग केले, पण ते चुकले आणि चेंडू खाब्राच्या पायापाशी गेला. त्याने मारलेला फटका सुब्रतने चपळाईने हाताने थोपविला.
पूर्वार्धात जमशेदपूरच्या पिटीने 38व्या मिनिटाला प्रयत्न केला, पण त्याने पास दिल्यावर नेटपाशी योग्य जागी एकही सहकारी नव्हता. त्यामुळे ही चाल वाया गेली.
दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी डेल्गाडोच्या पासवर डावीकडे आशिक कुरुनीयन याने लांबून मारलेला फठका स्वैर होता. 49व्या मिनिटाला मोबाशीर रेहमान याने चेंडूवर ताबा मिळवून उजवीकडून आगेकूच केली. कुरुनीयनला लागून चेंडू बाहेर गेला. त्यामुळे मिळालेल्या कॉर्नरवर पिटी काही करू शकला नाही. दोन्ही संघ अखेरपर्यंत निर्णायक गोल करू शकले नाहीत.