---Advertisement---

आयएसएल: गतविजेत्यांना लोळवणारा ओदिशा चमत्कार करणार केरला ब्लास्टर्सनाही पराभूत करणार?

On: मंगळवार, जानेवारी 11, 2022 7:18 PM
Kerala Blasters
---Advertisement---

गोवा| नववर्षातील पहिल्याच लढतीत गतविजेत्या मुंबई सिटी एफसीवर धमाकेदार विजय मिळवणारा ओदिशा एफसी संघ इंडियन सुपर लीगमध्ये ( आयएसएल) बुधवारी टेबल टॉपर केरला ब्लास्टर्सचा सामना करणार आहेत.

मुंबईचा सामना करण्याआधीच्या चार सामन्यांत ओदिशाला तीन पराभव पत्करावे लागले होते. त्यामुळे मुंबई सिटी एफसीविरुद्ध त्यांच्याकडून फार काही अपेक्षा नव्हत्या, परंतु त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देताना ४-२ असा विजय मिळवला. किको रॅमिरेझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ओदिशाच्या आक्रमणाची धार तीव्र आहे आणि जेव्हा खरी गरज आहे तेव्हा त्यांचा आक्रमणाचा वेगही प्रचंड वाढतो. ९ सामन्यांनंतर १३ गुणांसह ते ८व्या क्रमांकावर आहेत. केरलानं सात वर्षांत प्रथमच आयएसएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही कमालीचा उंचावला आहे. मागील सामन्यांत त्यांनी हैदराबाद एफसीवर विजय मिळवला. त्यांनी १० सामन्यांत ४ विजय, ५ ड्रॉ व १ पराभव असे निकाल नोंदवले आहेत.

केरला ब्लास्टर्सचे मुख्य प्रशिक्षक इव्हान व्हुकोमानोविच यांना, त्यांच्या संघात कोणत्याची आव्हानाला सामोरे जाण्याची धमक आहे, असा विश्वास आहे. ते म्हणाले,”आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो, असा विश्वास आम्हाला सुरुवातीपासूनच वाटत होताच. आणि जेतेपदाचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या संघांना सोपे सामनेही जिंकता येत नाही, हे आपण पाहतोय. आमचा संघ चांगला आहे आणि आम्ही यश मिळवू शकतो.”

अलव्हारो व्हॅझक्यूज हा केरलासाठी दमदार कामगिरी करतोय, त्यानं आतापर्यंत चार गोल केले आहेत. एड्रीयन ल्युना हाही त्याच्या खेळाचा मनमुराद आस्वाद लुटताना दिसतोय आणि या दोघांकडून अशाच कामगिरीची व्हुकोमानोविच यांना अपेक्षा आहे. कर्णधार जेसेल कार्नेईरो याला दुखापतीमुळे दीर्घकाळ मैदानाबाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. शिवाय हरमनज्योत सिंग खाब्रा याच्याही खेळण्यावर संदिग्धता आहे.

ओदिशाचा विचार केल्यास कर्णधार जेरी माविहमिंगथांगा याचा आक्रमण धारधार आहे. त्यानं मुंबई सिटी एफसीविरुद्धच्या लढतीत दोन गोल केले आणि एका गोलसाठी सहाय्य केलं. त्याची कामगिरी उल्लेखनीय झालेली पाहायला मिळतेय. पण, बचावफळीतील त्रुटी या ओदिशासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. मागील ९ सामन्यांत त्यांच्याविरोधात २२ गोल्स झाले आहेत. यंदाच्या पर्वातील बचावफळीचा हा सर्वात खराब रिकॉर्ड आहे.

प्रशिक्षक किको म्हणाले,आता सर्वकाही आमच्या मनाप्रमाणे होईल आणि तसा आत्मविश्वास खेळाडूंमध्ये निर्माण झाला आहे. आमचे खेळाडू आव्हान देण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत, परंतु आम्हाला केरलाच्या अलव्हारो, लुना व जॉर्ज पेरेयरा डाएझ यांच्यावर लक्ष ठेऊन खेळ करावा लागेल. ते चांगल्या फॉर्मात आहेत.”

बुधवारी होणाऱ्या सामन्यात गोल्सचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहिल्या लेगमध्ये केरलानं २-१ अशा फरकानं ओदिशावर विजय मिळवला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

प्रिन्स इबाराचा डबल धमाका; बेंगलोरने गतविजेत्या मुंबईला दिला धक्का

जमशेदपूरसमोर ईस्ट बंगालचे आव्हान

अव्वल स्थानावरील पकड मजबूत करण्याचे मुंबई सिटी एफसीचे लक्ष्य!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---