गोवा (दिनांक १० जानेवारी) – इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) यंदाच्या पर्वात गतविजेत्या मुंबई सिटी एफसीची सर्वात निराशाजनक कामगिरीची नोंद बंगलोर एफसीविरुद्धच्या सामन्यात झाली. मुंबईच्या बचावफळीकडून झालेल्या चुका बंगलोर एफसीच्या पथ्यावर पडल्या. पहिल्या हाफमध्येच बंगलोरनं प्रिन्स इबाराचे ( २३ मि. व ४५+४ मि. ) दोन आणि दानिश फारूक( ८ मि.) याच्या एक गोलच्या जोरावर ३-० अशी भक्कम आघाडी घेतली. मुंबईकडून दुसऱ्या हाफमध्ये त्याला उत्तर मिळण्याची अपेक्षा होती. परंतु ६०व्या मिनिटानंतर त्यांच्याकडून प्रत्युत्तराचा खेळ होताना दिसला. पण, त्यांच्या वाट्याला आज यश नव्हतेच आणि बंगलोरनं ३-० असा विजय पक्का केला. बंगलोरचा गोलरक्षक गुरप्रीत संधूनंही काही दर्जेदार बचाव केले. मुंबईला मागील पाच सामन्यांत विजय मिळवण्यात अपयश आलेय आणि ही त्यांच्यासाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे. बेंगलोरनं मागील पाच सामन्यांत अपराजित मालिका कायम राखताना दुसरा विजय नोंदवला.
सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला कॅसिओ गॅब्रीएल गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. मुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमणाला सुरुवात केली. दुसऱ्या मिनिटाला उत्तम सांघिक खेळ करताना पेलन्टी बॉक्सवर असलेल्या गॅब्रीएलसाठी हेडरद्वारे गोल करण्याची संधी निर्माण केली, परंतु बेंगलोर एफसीचा गोलरक्षक गुरप्रीत संधूनं तो अडवला. आपले खेळाडूंकडून केवढी मोठी चूक झालीय, हे संधूच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत होते. त्यानंतर मुंबईला कॉर्नरवरून गोल करण्याची संधी मिळाली, परंतु ते याहीवेळेस अपयशी ठरले. याचदरम्यान बेंगलोरचे खेळाडू काऊंटर अटॅकमध्ये चेंडू गोलजाळीच्या दिशेनं घेऊन गेले. नशीबाची साथ म्हणून गोल झाला नाही, परंतु ८व्या मिनिटाला बेंगलोरनं बाजी मारली. मुंबईच्या बचावफळीतील चूक हेरून ८व्या मिनिटाला दानिश फारूकनं बेंगलोरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या पर्वातील बेंगलोरचा हा सर्वात जलद गोल ठरला.
१४ व्या मिनिटाला उदांताच्या क्रॉसवर फारूकला व्हॉलीद्वारे दुसरा गोल करता आला असता, परंतु त्याचा व्हॉली मारण्याचा प्रयत्न फसला. बेंगलोरच्या खेळाचा आज तोडच नव्हता. आयएसएलच्या या पर्वात सर्वाधिक गोल नावावर असलेल्या मुंबई सिटीविरुद्ध बेंगलोरनं युद्धच छेडले. त्यांच्याकडून होत असलेल्या आक्रमणानं मुंबईचे खेळाडूही बिथरले होते आणि त्यांच्याकडून चुकांवर चुका होताना दिसल्या. २३व्या मिनिटाला बेंगलोरनं आणखी एक गोल केला. रोशन नाओरेमनं डाव्याबाजूनं मुंबईच्या बचावपटूंना चकवत पेनल्टी बॉक्सच्या दिशेनं चेंडू भिरकावला अन् प्रिन्स इबारानं संधी साधून हेडरद्वारे गोल केला. बंगलोरनं २-० अशी आघाडी घेतली. पहिल्या ३० मिनिटांत दोन्ही संघांकडून प्रत्येकी २-२ शॉन ऑन टार्गेट प्रयत्न झाले, परंतु मुंबईचे खाते रिकामीच राहिले. पहिल्या सत्रातील भरपाई वेळेच्या चौथ्या मिनिटाला इबारानं पुन्हा हेडरद्वारे गोल करून बंगलोरची आघाडी ३-० अशी मजबूत केली.
गतविजेत्या मुंबईसमोर ०-३ अशा पिछाडीवरून कमबॅक करण्याचे आव्हान होते. त्यांच्या बचावफळीत सातत्यानं चूका होताना दिसल्या अन् दुसऱ्या हाफमध्येची त्याची प्रचिती आली. ५०व्या मिनिटाला क्लेइटन सिल्वानं बेंगलोरची आघाडी आणखी वाढवली असती, पण त्यानं मारलेला चेंडू गोलजाळीवर बाहेरून आदळला. बंगलोरच्या खेळाचा दर्जा आज वेगळ्यात पातळीवर होता आणि त्याला तोडीसतोड खेळ करण्यात मुंबई अपयशी ठरले. ६२व्या मिनिटाला अमेय रनावडेकडे मुंबईला पहिला गोल मिळवून देण्याची संधी होती, परंतु पेलन्टी बॉक्समध्ये त्यानं स्वतः चेंडूवर इतका वेळ वाया घालवला की त्याची गोल करण्याची संधी हुकली. यानंतर मुंबईचा खेळ उंचावताना दिसला, परंतु बंगलोरचा गोलरक्षक त्यांच्या मार्गात सक्षमपणे उभा राहिला. ७९व्या मिनिटाला आशिक कुरूनियन चेंडू गोलजाळीनजीक घेऊन गेला, परंतु स्वार्थी खेळ दाखवल्यानं बंगलोरचा चौथा गोल होऊ शकला नाही. इगोल अँगुलो मुंबईला गोल मिळवून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करताना दिसला. पण, मुंबईचा पराभव तो टाळू शकला नाही.
निकाल – बेंगलोर एफसी ३ ( दानिश फारूक ८ मि., प्रिन्स इबारा २३ मि. व ४५+४ मि. ) विजयी विरूद्ध मुंबई सिटी एफसी – ०.