भारतीय संघ 5 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. स्पर्धेत भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वाखाली 10 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा वनवास संपवण्याचा प्रयत्न करेल. आयसीसी स्पर्धांमध्ये रोहितची बॅट चांगलीच तळपते. त्याने 2019 वनडे विश्वचषक स्पर्धेत धावांचा अक्षरश: पाऊस पाडला होता. मात्र, भारतीय संघ उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांनी पराभूत झाला होता. अशात श्रीलंका संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने रोहितचे जोरदार कौतुक केले. तसेच, त्याने सांगितले की, रोहितचा एक असा विक्रम आहे, जो विश्वचषकात मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी कठीण ठरेल.
काय म्हणाला मुरलीधरन?
आयसीसीने आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमात मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याने वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याच्यासोबत संवाद साधला. यावेळी त्याने रोहित शर्मा याच्या 2019 वनडे विश्वचषक (2019 ODI World Cup) स्पर्धेतील प्रदर्शनावर मत मांडले.
मुरलीधरन म्हणाला की, “रोहित शर्माचा विश्वचषकात 5 शतके करण्याचा विक्रम मोडणे खूपच कठीण जाईल. तुम्हाला फक्त 10-11 सामनेच मिळतील.” खरं तर, रोहित शर्माच्या नावावर 2019 विश्वचषकात 5 शतके झळकावण्याचा विक्रम आहे. कोणत्याही विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम हा रोहितच्याच नावावर आहे.
भारतीय संघाच्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेतील सामन्यांना 8 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. या पहिल्या सामन्यात भारतीय संघ चेन्नईच्या चेपॉक मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हात करेल. यानंतर भारताचा दुसरा सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर अफगाणिस्तानविरुद्ध होईल. यानंतर भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भिडेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारताचे पुढील सामने पुणे, धरमशाला, मुंबई, कोलकाता, लखनऊ आणि बंगळुरू या मैदानांवर खेळले जातील.
भारतीय संघाकडे सुवर्णसंधी
भारतीय संघाने 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि 2011 साली एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली वनडे विश्वचषक उंचावला होता. मात्र, त्यानंतर भारतीय संघाला वनडे विश्वचषक जिंकता आला नाहीये. अशात रोहितसेना भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (it is difficult to break hitman rohit sharma record in the world cup says muttiah muralitharan)
महत्वाच्या बातम्या-
पुणेरी बाप्पा की कोल्हापूर टस्कर्स, कुणाला मिळणार MPL Finalचे तिकीट, ‘क्वालिफायर 2’ सामना ठरणार निर्णायक
आयसीसीने वर्ल्डकप 2023साठी निवडली 10 मैदानं, फक्त ‘हे’ ग्राऊंड सोडून विराटने 9 ठिकाणी झळकावलंय शतक