आयसीसीने यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयसाठी आयपीएल २०२० चे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आयपीएल २०२० चे आयोजन संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये आयोजित केले जाण्याची दाट शक्यता आहे. याबद्दल आयपीएल संचालन परिषद येत्या ८-१० दिवसांत आयपीएलच्या १३ व्या मोसमाबद्दल निर्णय घेणार आहे.
आयपीएल संचालन परिषदेचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले आहे की त्यांनी आयपीएल बाहेर आयोजित करण्याच्या परवानगीसाठी भारत सरकारकडे अर्ज केला आहे. जर आयपीएल भारताबाहेर हलवण्यासाठी परवानगी मिळाली तर यावर्षी आयपीएल यूएईमध्ये होऊ शकते.
पटेल यांनी पीटीआयला सांगितले की, “आयपीएल संचालन परिषद आठवडा किंवा दहा दिवसांत बैठक घेईल आणि सर्व प्रकारचे निर्णय घेईल (अंतिम वेळापत्रकाबाबतही). आतापर्यंतची योजना तरी अशीच आहे की संपूर्ण ६० सामन्यांचा आयपीएल मोसम व्हावा. हा मोसम युएईमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे.”
तसेच पटेल म्हणाले, ‘अडचण फक्त कृतीत उतरवण्याची आहे. प्रेक्षक येणार नसतील तर आपण देशात किंवा बाहेरील देशामध्ये आयोजित केले तरीही ते काही फरक पडत नाही.’
आयसीसीच्या घोषणेआधीच आयपीएलशी संबंधित फ्रँचायझींनी त्यांच्या योजनांवर काम सुरू केले आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक भारतीय खेळाडू मैदानावर जाऊ शकत नाही. त्यामुळे सर्व आयपीएल संघांना कमीत कमी ३-४ आठवड्यांची तयारीसाठी गरज असेल.
आयपीएल संघाचे एक संघमालक पीटीआयला म्हणाले, ‘आमच्या खेळाडूंना किमान ३ ते ४ आठवड्यांच्या सरावाची आवश्यकता असेल. बीसीसीआयकडून तारखा जाहीर झाल्यानंतर आम्ही आमच्या सर्व अंतिम योजना तयार करु. आयपीएल युएईमध्ये झाले तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत.’
आयपीएलचा १३ वा मोसम याआधी एप्रिल-मेमध्ये होणार होता. परंतू कोरोना व्हायरसच्या संकटामुळे हा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. पण आता हा मोसम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये यूएईत होऊ शकतो. याआधीही २०१४ ला आयपीएलचे काही सामने यूएईमध्ये आयोजित करण्यात आले होते.
ट्रेंडिंग घडामोडी –
जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर टीम इंडिया करणार सराव, धोनीबद्दल मात्र…
इरफान पठाण- युवराज ट्विटरवरच एकमेकांना भिडले, तुला म्हणायचंय का भारताकडे….
स्टोक्स मैदानावर वेळ वाया घालवत आहे, त्यानं कोरोनाची लस शोधली पाहिजे