आज भारतीय पॅरालंम्पियन खेळाडू देवेंद्र झाझरिया याची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाली या बाबत महाराष्ट्राचा खेळाडू आणि भारतीय पॅरालंम्पियन स्वीमर सुयश जाधवने समाधान व्यक्त केले आहे.
या बाबत महास्पोर्ट्सशी बोलताना सुयश म्हणाला, ”देवेंद्र हा पहिला पॅरालंम्पियन खेळाडू आहे, ज्याच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी झाली आहे आणि त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. देवेंद्रला हा सन्मान नक्की मिळेल याची मला खात्री आहे. या सन्मानासाठी पॅरालंम्पियन खेळाडूच्या नावाची शिफारस होण्यास सुरुवात झाल्यामुळे अनेक खेळाडू या खेळांकडे वळतील.”
पुढे बोलताना सुयश म्हणाला, “दीपा मलिक, देवेंद्र झाझरिया, वरूण भाटी आणि मारियप्पन थांगावेलु यांनी देशासाठी पॅरालंम्पिकमध्ये पदके जिंकली आणि त्यांना देश ओळखायला लागला. त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला ही खूप समाधानाची बाब आहे. पदक जिंकल्यावर परिस्थिती बदलली असून लोक त्यांचा सन्मान करत आहेत. पदक जिंकल्यानंरची परिस्थिती आणि अगोदरची परिस्थिती वेगळी होती.
स्वतः बाबत बोलताना सुयश म्हणाला की, ”मी आता तंदरुस्त असून आगामी स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहे. अश्या चांगल्या गोष्टींमुळेच उत्तम कामगिरी करण्याचे बळ मिळते.”