इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामातील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात बुधवारी (१३ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सचा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. या सामन्यात कोलकाताचा कर्णधार ओएन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव करून कोलकाता येथे पोहोचले असून, दिल्लीला पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसऱ्या क्वालिफायरचा विजेता शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नईविरुद्ध अंतिम सामना खेळेल. पहिल्या क्वालिफायर सामन्यावेळी कोलकाता आणि दिल्लीच्या खेळाडूंचे एक छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
तेरा यार हूं मै
व्हायरल होत असलेल्या या छायाचित्रामध्ये दिल्लीचा वेगवान गोलंदाज आवेश खान हातात प्लेट पकडला आहे आणि तो या प्लेटमध्ये ठेवलेले पदार्थ कोलकाताचा उदयोन्मुख अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला भरलत आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर हे छायाचित्र पोस्ट करताना कॅप्शनमध्ये, ‘तेरा यार हूं मैं’ असे लिहिले. आवेश व अय्यर मध्य प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतात. कोलकात्याने शेअर केलेले हे छायाचित्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. चाहतेही या छायाचित्रावर मजेदार कमेंट्स करत आहेत. या पोस्टला आतापर्यंत सुमारे ५०,००० लाईक्स मिळाले आहेत.
दिल्लीची हाराकिरी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी संघाला वेगवान सलामी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरूण चक्रवर्ती याने पाचव्या षटकात शॉला बाद करत केकेआरला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर शिखर, मार्कस स्टॉयनिस व रिषभ पंत हे लागोपाठ बाद झाले. शिमरन हेटमायर व श्रेयस अय्यर यांनी उपयुक्त खेळ्या करत संघाला १३५ धावांपर्यंत मजल मारून दिली.