---Advertisement---

केकेआरविरुद्ध युएईत चालतेच जड्डूची तलवार; धडाकेबाज फलंदाजीने जिंकून दिलेत सलग दोन सामने

On: रविवार, सप्टेंबर 26, 2021 8:35 PM
---Advertisement---

अबूधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल २०२१ मधील ३८ वा सामना खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या या सामन्यात चेन्नईने अखेरच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. या विजयासह चेन्नई प्ले ऑफसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ बनला. चेन्नईच्या या विजयाचा नायक अष्टपैलू रवींद्र जडेजा ठरला. त्याने एकोणीसाव्या षटकात केलेल्या आक्रमक फटकेबाजीने सामना चेन्नईच्या बाजूने झुकला. यासह त्याने कोलकाता विरुद्धच्या आपल्या एका कामगिरीची पुनरावृत्ती केली.

जडेजाने केली त्या खेळीची पुनरावृत्ती
अखेरच्या दोन षटकात चेन्नईला विजयासाठी २४ धावांची गरज असताना चेन्नईचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने प्रसिद्ध कृष्णा याला दोन चौकार व दोन षटकार खेचत सामना चेन्नईच्या बाजूने झुकवला. अखेरच्या षटकात ४ धावा शिल्लक असताना सुनील नरीनने करन व जडेजा यांना बाद केले. मात्र, अखेरच्या चेंडूवर दीपक चहरने एक धाव काढत संघाला विजयी केले.

जडेजाने आजच्या खेळीत केवळ‌ चेंडूत २२ धावा काढत संघाला विजयच्या दिशेने नेले. जडेजाने मागील वर्षी दुबईच्या मैदानावर कोलकाता विरुद्ध १७३ धावांचा पाठलाग करत असताना ११ चेंडूत नाबाद ३१ धावाच चोपल्या होत्या. युएई येथील चेन्नई विरुद्ध कोलकत्ता यांच्यात झालेले अखेरचे दोन्ही सामने चेन्नईला जिंकून देण्यात जडेजाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

चेन्नई गुणतालिकेत प्रथमस्थानी
पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाताच्या सर्व फलंदाजांनी थोडे थोडे योगदान दिले. राहुल त्रिपाठीने मागच्या सामन्यातील आपला फॉर्म कायम राखत ४५ धावांची खेळी केली. नितीश राणा व दिनेश कार्तिक यांनी अखेरच्या षटकांमध्ये अनुक्रमे ३७ व‌ २६ धावांचे योगदान दिले. सीएसकेसाठी अष्टपैलू शार्दूल ठाकूर व जोश हेजलवूडने प्रत्येकी दोन बळी मिळवले.
कोलकाताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला ऋतुराज गायकवाड व फाफ डू प्लेसिस यांनी ७४ धावांची सलामी दिली. परंतु, अचानक एका पाठोपाठ तीन फलंदाज बाद झाल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली. १९ व्या षटकात रवींद्र जडेजाने केलेल्या फटकेबाजीमुळे सामना चेन्नईच्या बाजूने झुकला. अखेरच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विजय मिळताच चेन्नईने पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान गाठत, प्ले ऑफ फेरी गाठणारा दुसरा संघ होण्याचा मान मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---