अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये सर रवींद्र जडेजाच्या बॅटने धडाधड फटकेबाजी केली. जडेजाने टेस्ट क्रिकेटमधील आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवत आणखी एक अर्धशतक झळकावले. जडेजाने केवळ 75 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. या खेळीमध्ये तो आक्रमक शैलीत खेळताना दिसला. अर्धशतक गाठण्यापूर्वीच त्याने चार षटकार लगावले. जडेजाने रिषभ पंतचा विक्रम धुळीस मिळवला आहे, या विशेष बाबतीत एमएस धोनीलाही मागे टाकले आहे.
रविंद्र जडेजा आक्रमक शैलीत मैदानावर उतरला. त्याने आपला स्कोअर सुरू होण्याच्या अगदी लगेचच जॉमेल वॉरिकनच्या एका ओव्हरमध्ये दोन षटकार मारून आपली भूमिका स्पष्ट केली. जडेजाने आपली ताबडतोब फलंदाजी अशीच सुरू ठेवली.
जडेजाने आपले अर्धशतक केवळ 75 चेंडूत पूर्ण केले. जडेजाने फिफ्टीपर्यंत पोहोचताना चार षटकार आणि तीन चौकार लगावले. म्हणजे 50 पैकी 36 रन त्याने फक्त बाउंड्रीवरूनच कमावले.
जडेजा या वर्षी भारतकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या बाबतीत रिषभ पंतला मागे टाकले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीमध्ये जडेजाच्या बॅटमधून 2025 मध्ये त्याचे सातवे अर्धशतक आले. तर पंतच्या नावावर सहा अर्धशतक नोंदवले आहेत.
सर जडेजा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीने आपल्या टेस्ट कारकिर्दीत 78 षटकार मारले होते. तर जडेजाने आता क्रिकेटच्या सर्वात लांब फॉर्मेटमध्ये 79 षटकार ठोकले आहेत. या यादीत आता जडेजापुढे फक्त रोहित शर्मा, वीरेंद्र सहवाग आणि रिषभ पंत हे आहेत. रोहितने 88 षटकार मारले आहेत, तर पंत आणि वीरूने प्रत्येकी 90 षटकार ठोकले आहेत.






