गॉल। श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात सध्या दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात खेळताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनेने श्रीलंकेच्या पहिल्या डावात ६ विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने एक मोठा विश्वविक्रम केला आहे.
अँडरसनने शनिवारी (२३ जानेवारी) श्रीलंकेच्या पहिल्या डावात १२१ व्या षटकात यष्टीरक्षक फलंदाज निरोशान डिकवेल्लाला बाद केले. ही त्याची या डावातील ५ वी विकेट ठरली. याबरोबरच अँडरसनची ही एका कसोटी डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही ३० वी वेळ ठरली. तसेच तो आशिया खंडात एका कसोटी डावात ५ विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर वेगवान गोलंदाज ठरला.
त्याने जेव्हा शनिवारी डिकवेल्लाची विकेट घेतली तेव्हा त्याचे वय ३८ वर्षे १७७ दिवस इतके होते. त्यामुळे त्याने रिचर्ड हॅडली यांना आशिया खंडात एका कसोटी डावात ५ विकेट्स घेणाऱ्या वयस्कर वेगवान गोलंदाजांच्या यादीत मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे. हॅडली यांनी ३७ वर्षे १४५ दिवस इतके वय असताना मुंबईमध्ये भारताविरुद्ध एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
आशिया खंडात एका कसोटी डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे वयस्कर वेगवान गोलंदाज –
३८ वर्षे १७७ दिवस – जेम्स अँडरसन विरुद्ध श्रीलंका, गॉल २०२१
३७ वर्षे १४५ दिवस – रिचर्ड हॅडली विरुद्ध भारत, मुंबई, १९८८/८९
३७ वर्षे १३३ दिवस – रिचर्ड हॅडली विरुद्ध भारत, बेंगळुरु, १९८८/८९
३५ वर्षे ३३२ दिवस – ख्रिस मार्टिन विरुद्ध भारत अहमदाबाद, २०१०/११
अँडसनने घेतल्या ६ विकेट्स –
अँडरसनने डिकवेल्लाला बाद करण्याआधी लहिरु थिरिमन्ने(४३), कुशल परेरा(६), ओशाडा फर्नांडो(०) आणि अँजेलो मॅथ्यूज(११०) यांना बाद केले होते. तसेच त्याने डिकवेल्ला नंतर सुरंगा लकमलला बाद करत ६ विकेट्स पूर्ण केल्या. त्याने या डावात एकूण २९ षटके गोलंदाजी करताना ४० धावा देत या ६ विकेट्स घेतल्या.
याबरोबरच तो कसोटीमध्ये सर्वाधिकवेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर मुथय्या मुरलीधरन आहे. त्याने ६७ डावात अशी कामगिरी केली आहे.
इंग्लंड दुसऱ्या दिवसाखेर २ बाद ९८ धावांवर
श्रीलंकेचा पहिला डाव सर्वबाद ३८१ धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. त्यांचे सलामीवीर जॅक क्राऊले आणि डॉमनिक सिब्ले झटपट बाद झाले. मात्र त्यानंतर कर्णधार जो रुटने अर्धशतक करत डाव सावरला. इंग्लंडने दुसऱ्या दिवसाखेर २ बाद ९८ धावा केल्या आहेत.
कसोटीत सर्वाधिक वेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
६७ – मुथय्या मुरलीधरन
३७ – शेन वॉर्न
३६ – रिचर्ड हॅडली
३५ – अनिल कुंबळे
३४ – रंगना हेराथ
३० – जेम्स अँडरसन
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमुळे ‘हा’ परदेशी क्रिकेटर झाला मालामाल, कमाई ऐकून उंचावतील तुमच्या भुवया
“खचू नकोस, तुझीही वेळ येईल”, ऑसींविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर रहाणेने कुलदीपला दिला धीर






