इंडियन प्रीमियर लीगची क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये गणना केली जाते. आयपीएलचे संघ खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात. काही खेळाडूंना तर फक्त एका हंगामाचे कित्येक कोटी रुपये मिळतात. आजवर आयपीएलद्वारे सर्वाधिक पैसे कमावणाऱ्या खेळाडूंमध्ये एमएस धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली यांचे नाव येते. या सूचीत आता दक्षिण आफ्रिकाचा धाकड फलंदाज एबी डिविलियर्स याचे नाव जोडले गेले आहे. डिविलियर्स हा आयपीएलमध्ये सर्वाधिक पैसे कमावणारा परदेशी क्रिकेटपटू ठरला आहे.
डिविलियर्सने आयपीएलद्वारे कमावलेत शंभर कोटी
डिविलियर्सने २००८ साली दिल्ली डेअरडेविल्स संघाद्वारे आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यावेळी दिल्ली संघाने १ कोटीहून अधिक रक्कम देत त्याला आपल्या संघात सहभागी केले होते. त्यापुढील दोन हंगामातही दिल्लीकडून एका हंगामाचे त्याला १ कोटीपेक्षा जास्त पैसे मिळाले.
त्यानंतर आयपीएल २०११ मध्ये जवळपास ५ कोटी रुपयांत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने डिविलियर्सला विकत घेतले. पुढील २ हंगामातही बेंगलोरकडून त्याला ५ कोटी रुपये मिळाले. पुढे डिविलियर्सने बेंगलोरसाठी अतुलनीय कामगिरी करत फ्रँचायझींची मने जिंकली. त्यामुळे पुढील चार हंगामात त्याला ९ कोटी ५० लाख रुपये मिळू लागले. तर २०१८ पासून त्याला तब्बल ११ कोटी रुपये मिळू लागले. अशाप्रकारे आयपीएल २०२० पर्यंत त्याने आयपीएलद्वारे एकूण ९१ कोटींची कमाई केली होती.
नुकत्याच आयपीएल फ्रँचायझींनी कायम केलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर बेंगलोरने डिविलियर्सला संघात कायम केले असून येत्या आयपीएल २०२१ साठी त्याला बेंगलोरकडून ११ कोटी मिळणार आहेत. यासह डिविलियर्सने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. सोबतच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक पैसे कमावणारा पहिला परदेशी क्रिकेटपटू ठरला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक पैसे कमावणारे टॉप-६ खेळाडू
आयपीएलमध्ये सर्वात जास्त मालमाल असणाऱ्या खेळाडूंमध्ये डिविलियर्सचा सहावा क्रमांक लागतो. आयपीएलमध्ये सर्वाधिक पैसे कमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी अव्वलस्थानी आहे. तर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. याव्यतिरिक्त मिस्टर आयपीएल सुरेश रैना पाचव्या व गौतम गंभीर पाचव्या क्रमांकावर आहेत.