साऊथँम्पटन। इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटीत आज (२५ ऑगस्ट) पाचव्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने खास विक्रम केला आहे. त्याने कसोटीमध्ये ६०० विकेट्स घेण्याचा विक्रम रचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार अझर अली जेम्स अँडरसनची ६०० वी विकेट ठरला.
अँडरसन कसोटीत ६०० विकेट्स घेणारा जगातील केवळ चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. तर पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांनी कसोटीत ६०० विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. पण हे सर्वजण फिरकीपटू आहेत.
अँडरसनने १५६ वा कसोटी सामना खेळताना हा पराक्रम केला आहे.
पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला फॉलोऑन दिला आहे. इंग्लंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ५८३ धावांवर पहिला डाव घोषित केला होता. त्यानंतर पाकिस्तानला पहिल्या डावात २७३ धावाच करता आल्या. या डावात इंग्लंडकडून अँडरसनने ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याने काल पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात अबीद अलीला बाद करत ५९९ वी विकेट घेतली होती. तर आज त्याने अखेर अझरला बाज करत ६०० वी विकेट घेण्याचा इतिहास रचला.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
८००- मुथय्या मुरलीधरन, सामने- १३३
७०८- शेन वॉर्न, सामने- १४५
६१९- अनिल कुंबळे, सामने- १३२
६००- जेम्स अँडरसन, सामने- १५६
५६३- ग्लेन मॅकग्रा, सामने- १२४