भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून (४ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लवकर बसला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने डावाच्या पहिल्याच षटकात सलामीवीर शुबमन गिलला शुन्य धावेवर पायचीत केले. यासह, अँडरसनने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.
पहिल्या षटकात भारताला बसला धक्का
मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत पाहुण्या इंग्लंड संघाचा पहिला डाव २०५ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. युवा सलामीवीर शुबमन गिलला इंग्लंडसाठी पहिले षटक टाकणाऱ्या अनुभवी जेम्स अँडरसनने खातेही न खोलू देता पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पायचीत केले. गिल या मालिकेत दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे.
अँडरसनचा कारनामा
चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा पहिला बळी मिळवणाऱ्या जेम्स अँडरसनने एक विशिष्ट विक्रम आपल्या नावे केला. आपला १६० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणाऱ्या अँडरसनने आपल्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत तब्बल १०४ फलंदाजांना शून्य धावेवर तंबूचा रस्ता दाखवला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने देखील आपल्या कारकिर्दीत खेळलेल्या १२४ कसोटींमध्ये १०४ फलंदाजांना खाते खोलू दिले नव्हते.
त्यामुळे आता शुन्य धावेवर सर्वाधिक फलंदाजांना बाद करण्याच्या मॅकग्रा यांच्या विश्वविक्रमाशी अँडरसनने बरोबरी केली आहे.
अँडरसन व मॅकग्रा यांच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान लेगस्पिनर शेन वॉर्न आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी नावावर असणाऱ्या श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन यांनी प्रत्येकी १०२ फलंदाजांना शून्यावर बाद केले होते. दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन यानेदेखील ८० फलंदाजांना शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला आहे.
वेस्ट इंडीजचे दिग्गज वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श व पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम यांनी देखील प्रत्येकी ७९ खेळाडूंना शून्यावर माघारी धाडले होते. सध्या अँडरसनचा सहकारी असलेला स्टुअर्ट ब्रॉड हादेखील या यादीमध्ये समाविष्ट आहे. त्याने आत्तापर्यंतच्या आपल्या कसोटी कारकिर्दीत ७८ खेळाडूंना खाते न खोलू देता बाद केले आहे.
अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व
चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या कसोटीत पहिल्या दिवसावर यजमान भारताने वर्चस्व गाजवले. भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा सुरेख कामगिरी करत इंग्लंडचा डाव २०५ धावांवर संपविला. भारताकडून पुन्हा एकदा अक्षर पटेलने सर्वाधिक चार बळी आपल्या नावे केले. इंग्लंडकडून एकमेव अर्धशतक बेन स्टोक्स याच्या बॅटमधून आले.
प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाखेर भारताने शुबमन गिलचा बळी गमावत २४ धावा बनविल्या आहेत. रोहित शर्मा ८ तर चेतेश्वर पुजारा १५ धावा काढून नाबाद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तो’ मैदानावर येताच सिराजला मिळाली विकेट, बघा कोण आहे ‘मिया भाई’चा लकीचार्म
‘बेन स्टोक्सने मला शिवी दिल्याचे विराटला सांगितले, मग त्याने पुढे सर्व सांभाळले’, सिराजचा खुलासा
पोलार्डने सहा षटकरांच्या विक्रमाची बरोबरी केल्यावर युवराजने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाला…