इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवात अत्यंत उत्कृष्ट राहिली. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानात एक ऐतिहासिक विजय मिळवला. ज्याची सर्वत्र चर्चा आणि कौतुक देखील झाले. या कसोटी सामन्यात भारतीय संघाने फलंदाजीसोबतच गोलंदाजीत देखील कमाल केली. त्यामुळे, यजमान संघाला १५१ धावांनी पराभूत करत मालिकेत ०-१ ने आघाडी घेतली.
लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजांच्या चांगल्या सुरुवातीनंतर गोलंदाजांनी देखील उत्कृष्ट प्रदर्शन केले. पहिल्या दिवसापासून भारतीय संघ आक्रमक स्वरूपात खेळत होता. या सामन्यातील चौथ्या दिवशी इंग्लिश खेळाडू आणि भारतीय खेळाडू यांच्यातील वाद देखील चांगलाच रंगला होता.
यादरम्यान, जसप्रीत बुमराहच्या सलग बाउन्सरबाबत आता इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनने वक्तव्य केले आहे. अँडरसनने ‘टेलेंडर्स पॉडकास्ट’मध्ये बोलताना सांगितले, “मी ज्यावेळी फलंदाजीसाठी मैदानात आलो. तेव्हा बुमराहने माझ्याविरुद्ध लागोपाठ शॉर्ट बाउंसर आणि यॉर्कर गोलंदाजी करायला सुरुवात केली. त्यावेळी मला असे वाटले की, तो मला आऊट करण्याचा प्रयत्नच करत नाहीये. मी त्यावेळी पिचवर टिकून राहण्याचा प्रयत्न करत होतो. कसेही करून मला जो रूटला स्ट्राईक द्यायची होती. बुमराहने २ यॉर्कर्स देखील टाकले. ज्याला खेळायला मी यशस्वी तर झालो.”
पुढे सविस्तर बोलताना तो म्हणाला, “मैदानात आल्याबरोबर रूटने मला खेळपट्टी धीमी असल्याचे सांगितले होते. तसेच बुमराहची गोलंदाजी गती देखील संथ होत असल्याचे सांगितले होते. मात्र, जेव्हा मी बुमराहचा पहिला चेंडू खेळलो, तर तो तब्बल ९० मीलच्या गतीने टाकला होता. त्यामुळे मी आश्चर्यचकीत झालो. आतापर्यंतच्या कारकिर्दीत मला असे कधीच जाणवले नव्हते. मला वाटले की बुमराह मला आऊट करण्याचा प्रयत्नच करत नाहीये.”
“बुमराहने त्या षटकात माझ्या मते १०-१२ चेंडू टाकले असतील. तो लागोपाठ शॉर्ट आणि नोबॉल टाकत होता. त्यावेळी बुमराहचे दोन चेंडू माझ्या पायावर आले होते. त्याला कसेबसे खेळण्यात मी यशस्वी झालो. त्यावेळी माझ्या मनात एकच भावना होती. काहीही करून मला खेळपट्टीवर टिकून राहायचे आहे आणि रूटला स्ट्राईक द्यायची आहे,” असेही यावेळी बोलताना अँडरसन म्हणाला.
लॉर्ड्स कसोटीदरम्यान ज्यावेळी जेम्स अँडरसन फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी जसप्रीत बुमराहने १० चेंडूंचे एक षटक फेकले होते. त्या षटकात त्याने नो चेंडू टाकले होते. बुमराहने जेम्स अँडरसन विरुद्ध बाउंसर चेंडूंचा वापर केला होता.
लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अँडरसनने पहिल्या डावात भारतीय संघाच्या ५ खेळाडूंना आउट केले होते. मात्र, दुसर्या डावात तो भारतीय संघाच्या विकेट काढण्यात अपयशी राहिला. दरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांनी जय्यत तयारी केली असेल. इंग्लंडसाठी तिसरा कसोटी सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. एका पाठोपाठ इंग्लंडचे अनेक खेळाडू दुखापतीमुळे माघार घेत आहे. अशात तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ कोणत्या खेळाडूंसह मैदानात उतरणार हे बघावे लागेल.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना बुधवारी (२५ ऑगस्ट) पासून हेडिंग्लेच्या मैदानावर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–रवी शास्त्रींनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, माजी पाकिस्तानी क्रिकेटरचे मत
–इंग्लंडच्या ‘प्लेइंग ११’ मध्ये व्हावेत ‘हे’ फेरबदल, माजी इंग्लिश क्रिकेटरने निवडला संघ
–भारीच ना! पृथ्वीने ‘किंग’ कोहली अन् संघसहकाऱ्यांसोबत वर्कआऊट करतानाचा फोटो केला शेअर, म्हणाला…