गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात सोमवारी जमशेदपूर एफसीने ओदिशा एफसीवर 1-0 असा विजय मिळविला. याबरोबरच जमशेदपूरने बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. मध्य फळीतील भारताचा 22 वर्षीय महंमद मोबाशीर याने जमशेदपूरचे खाते 41व्या मिनिटाला उघडले. हाच गोल निर्णायक ठरला.
जमशेदपूरचा 15 सामन्यांतील हा चौथा विजय असून सहा बरोबरी व पाच पराभव असा कामगिरीसह त्यांचे 18 गुण झाले. त्यांनी आठवरून दोन क्रमांक प्रगती करीत सहावे स्थान गाठले. जमशेदपूर पाचव्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेडपेक्षा तीन गुणांनी मागे आहे. नॉर्थईस्ट युनायटेडचे 14 सामन्यांत 21 गुण आहे. चौथ्या क्रमांकावरील गोव्याचेही तेवढेच गुण आहेत. या निकालामुळे बाद फेरीची चुरस वाढली आहे.
ओदीशाला 14 सामन्यांत आठवा पराभव पत्करावा लागला. एक विजय व पाच बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे आठ गुण व अखेरचे 11वे स्थान कायम राहिले.
मुंबई सिटी एफसी 14 सामन्यांतून 9 विजयांसह 30 गुण मिळवून आघाडीवर आहे. एटीके मोहन बागान दुसऱ्या क्रमांकावर असून 14 सामन्यांतून 8 विजयांसह 27 गुण अशी त्यांची कामगिरी आहे. तिसऱ्या क्रमांकावरील हैदराबाद एफसीचे 15 सामन्यांतून 22 गुण आहेत. एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांची 14 सामन्यांतून 21 गुण अशी समान कामगिरी आहे. यात गोव्याचा 5 (19-14) गोलफरक नॉर्थईस्टच्या 1 (19-18) पेक्षा सरस आहे.
पूर्वार्धाच्या अंतिम टप्प्यात मोबाशीरला गोलक्षेत्रात उजवीकडे पास मिळाला. त्यावेळी स्ट्रायकर नेरीयूस वॅल्सकीस हा सुद्धा संधीच्या प्रतिक्षेत होता. त्याने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण मोबाशीरने चेंडूला किक मारली. त्यामुळे ओदिशाचा गोलरक्षक अर्शदीप सिंग चकला.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानचा ब्लास्टर्सवर पिछाडीवरून विजय
आयएसएल २०२०-२१ : नॉर्थईस्ट युनायटेडचा मुंबई सिटीला पुन्हा धक्का
आयएसएल २०२०-२१ : नाट्यमय लढतीत गोवा-ईस्ट बंगाल बरोबरी