गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) सोमवारी जमशेदपूर एफसीने गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या मुंबई सिटी एफसीला दहा खेळाडूंनिशी 1-1 असे बरोबरीत रोखले. नवव्याच मिनिटाला खाते उघडलेल्या जमशेदपूरला तासभर दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. पिछाडीवर पडल्यानंतर मुंबईने सहा मिनिटांत बरोबरी साधली, पण त्यानंतर त्यांना आणखी फायदा उठवता आला नाही. त्यामुळे पहिल्या 15 मिनिटांतील बरोबरीची कोंडी कायम राहिली. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.
सर्जिओ लॉबेरा प्रशिक्षक असलेल्या मुंबई सिटीची ही 6 सामन्यांतील पहिलीच बरोबरी असून चार विजय व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 13 गुण झाले. दुसऱ्या क्रमांकावरील नॉर्थईस्ट युनायटेड आणि तिसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागान यांच्यावरील आघाडी मुंबई सिटीने तीन गुणांनी वाढवली. नॉर्थईस्ट व एटीकेएमबी यांचे प्रत्येकी दहा गुण आहेत. बेंगळुरू एफसी (5 सामन्यांतून 9 गुण) चौथ्या क्रमांकावर आहे. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या जमशेदपूरची ही 6 सामन्यांतील चौथी बरोबरी असून एक विजय व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे सात गुण झाले. हैदराबाद एफसीला (4 सामन्यांतून 6 गुण) मागे टाकत जमशेदपूरने सातवे स्थान गाठले.
जमशेदपूरचा मध्यरक्षक ऐतोर मॉनरॉय याला 28व्या मिनिटाला दुसऱ्या यलो कार्डमुळे मैदान सोडावे लागले. स्पेनच्या या 33 वर्षीय खेळाडूने मुंबई सिटीचा मध्यरक्षक रॉलिन बोर्जेसला पाडले. त्याआधी 14व्या मिनिटाला त्याला धसमुसळ्या खेळामुळे यलो कार्डला सामोरे जावे लागले होते. तेव्हा त्याने मुंबईचा मध्यरक्षक सी गोडार्ड याला पाडले होते.
सुरुवात डळमळीत होऊनही आधी खाते उघडण्यात जमशेदपूरने यश मिळवले. मुंबई सिटीचा स्ट्रायकर बार्थोलम्यू ओगबेचे याने ढिसाळपणे मारलेला चेंडू जमशेदपूरचा मध्यरक्षक जॅकीचंद सिंग याने शिताफीने रोखत त्यावर ताबा मिळवला. वेगाने आणि कौशल्याने ड्रिबलिंग करीत त्याने गोलक्षेत्रात प्रवेश केला. मग मुंबई सिटीचा बचावपटू मेहताब सिंग याला चकवत त्याने नेरीयूस वॅल्सकीसला पास दिला. वॅल्सकीसने मोकळीक मिळताच नेटच्या उजव्या कोपऱ्यात चेंडू मारताना मुंबई सिटीचा गोलरक्षक अमरींदर सिंग याला चकवले. वॅल्सकीस याचा हा सहा सामन्यांतील सहावा गोल आहे. संघाच्या सात पैकी सहा गोलचा मानकरी तो ठरला. मुंबई सिटीने सहा मिनिटांत बरोबरी साधली. आघाडी फळीतील अॅडम ली फाँड्रे याने डावीकडून गोलक्षेत्रात मध्यरक्षक बिपीन सिंगला पास दिला. बिपीनने संतुलन साधत ओगबेचे याच्या दिशेने चेंडू मारला. त्यानंतर ओगबेचेने जमशेदपूरचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश याला चकवले.
दुसऱ्या सत्रात 51व्या मिनिटाला मुंबईच्या बिपीन सिंगने डावीकडे जमशेदपूरचा बचावपटू करण अमीन याला चकवले. त्याने गोलक्षेत्रात मारलेल्या चेंडूवर ओगबेचेने ताबा मिळवला, पण ओगबेचे अचूक फटका मारू शकला नाही. 56व्या मिनिटाला मुंबई सिटीला मिळालेला कॉर्नर बिपीनने घेतला, पण या मध्यरक्षकाने गोलक्षेत्रात खूप खोलवर चेंडू मारला. त्यामुळे मुंबई सिटीच्या एकाही खेळाडूला सेट-पीसेसचा फायदा उठवता आला नाही.
65व्या मिनिटाला गोडार्डने डावीकडून पास दिल्यानंतर ओगबेचेने अहमद जाहू याच्या प्रतिसादानुसार चेंडू जाऊ दिला. अहमदचा फटका मात्र कमकुवत होता. त्यामुळे रेहेनेश आरामात अडवू शकला. अंतिम टप्प्यात दोन्ही संघांचे खेळाडू अथक प्रयत्न करूनही निर्णायक गोल करू शकले नाहीत.
संबधित बातम्या:
– आयएसएल २०२०: ब्लास्टर्सचा धुव्वा उडवित बेंगळुरू चौथ्या स्थानावर
– आयएसएल २०२०: अँग्युलोच्या गोलमुळे ओदिशाला हरवून गोव्याची आगेकूच
– आयएसएल २०२०: ब्लास्टर्सचा धुव्वा उडवित बेंगळुरू चौथ्या स्थानावर