गोवा: जमशेदपूर एफसी इंडियन सुपर लीग (आयएसएल) २०२१-२२चे लीग शिल्ड चॅम्पियन ठरले. त्यांनी प्रथमच ही शिल्ड नावावर केली. सोमवारी झालेल्या लढतीत त्यांनी एटीके मोहन बागानवर १-० असा विजय मिळवला आणि इतिहास घडवला. जमशेदपूरचा हा सलग सातवा विजय ठरला आणि आयएसएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला संघ ठरला. रित्विक दासने गोल करून हा विजय पक्का केला असला तरी पीटर हार्टली या सामन्याचा नायक ठरला. त्याची बचावभींत मोहन बागानला ओलांडता आली नाही. आता जमशेदपूरला आयएसएलचे जेतेपद खुणावत आहे आणि उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर केरला ब्लास्टर्सचे आव्हान आहे.
२०१७मध्ये आयएसएलमध्ये पदार्पण करणाऱ्या जमशेदपूरने याआधी कधीच अव्वल चौघांत स्थान पटकावले नव्हते. पहिल्या दोन पर्वात त्यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. २०१९-२०मध्ये ते थेट ८व्या क्रमांकावर फेकले गेले आणि २०२०-२१मध्ये त्यांनी कामगिरीत किंचीत सुधारणा करताना ६व्या स्थानापर्यंत मजल मारली. पण, यंदाच्या पर्वात त्यांनी कमाल करून दाखवली. २० सामन्यांत १३ विजय, ४ ड्रॉ आणि ३ पराभव अशा निकालांसह त्यांनी सर्वाधिक ४३ गुणांची कमाई केली. जमशेदपूरने या विजयासोबत साखळी फेरीत सर्वाधिक ४३ गुणही कमावले आणि इतके गुणही आतापर्यंत कोणाला कमावता आलेले नव्हते. याआधी बंगलोर एफसीने २०१७-१८ आणि एटीके मोहन बागान व मुंबई सिटी एफसी यांनी २०२०-२१मध्ये साखळी फेरीत प्रत्येकी ४० गुण कमावले होते.
जमशेदपूरला आज मोहन बागानने सुरुवाती कडवी टक्कर दिली. पहिल्या १५ मिनिटांत मोहन बागानचे वर्चस्व जाणवले. चेंडूवर ताबा, नियंत्रित खेळ याने त्यांनी जमशेदपूरला आव्हान दिले. पहिल्या हाफमध्ये मोहन बागानकडून ९ प्रयत्न झाले, तर जमशेदपूरकडून फक्त तीनच प्रयत्न झाले. पण, दुसऱ्या हाफमध्ये जमशेदपूर एफसीने खेळ कमालीचा उंचावला आणि त्यांना ५७व्या मिनिटाला यश मिळाले. ५७व्या मिनिटाला ग्रेग स्टीवर्टने मोहन बागानच्या बचावफळीचा चांगलेच चकवले आणि त्याला रित्विक दासची साथ मिळाली. रित्विकने पेनल्टी बॉक्समधून सुरेख गोल करताना जमशेदपूरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जमशेदपूरने सावध खेळ करताना चेंडूवर ताबा राखण्याचा खेळ सुरू केला.
६६व्या मिनिटाला मोहन बागानच्या डेव्हिड विलियम्सने थेट निशाणा साधला, परंतु जमशेदपूरच्या गोलरक्षकाने तो अडवला. मोहन बागानला अपयश येताना पाहून प्रशिक्षक ज्युआन फेरांडोही निराश झालेला पाहायला मिळाले. मोहन बागानला लीग शिल्डसाठी हा सामना किमान २ गोलच्या फरकाने जिंकायचा होता.
त्यांच्यासमोर अखेरच्या १० मिनिटांत तीन गोल करण्याचे आव्हान होते, परंतु जमशेदपूरचा बचावही तितकाच भक्कम होता. ८५व्या मिनिटाल कोलासोचा प्रयत्न जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेशने अडवला. जमशेदपूरचा बचाव एवढा चांगला झाला की मोहन बागानच्या खेळाडूंना चेंडू पेनल्टी बॉक्समध्ये घेऊन जाताच येत नव्हता. ९०+७ मिनिटांच्या खेळात जमशेदपूरने १-० असा विजय मिळवून इतिहास घडवला.
🛡️ HISTORY. HAS. BEEN. CREATED. 🛡️#ATKMBJFC #JamKeKhelo pic.twitter.com/bCAThg1sf9
— Jamshedpur FC (@JamshedpurFC) March 7, 2022
मात्र, मोहन बागानला मोठा विक्रम करता आलेला नाही. त्यांनी ही लढत बरोबरीत सोडवली असती, तर आयएसएलच्या इतिहासात सलग १६ सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला असता.
महत्त्वाच्या बातम्या-
जरा इकडे पाहा! आठ गोलांनंतरही गोवा अन् केरलामधील सामना सुटला बरोबरीत
‘एक नंबर’ कोणाचा?, जमशेदपूर- एटीके मोहन बागान यांच्या लढतीत होणार फैसला
गतविजेत्या मुंबई सिटीचे आव्हान संपुष्टात, हैदराबादच्या विजयाने केरला ब्लास्टर्स उपांत्य फेरीत