गुवाहाटी। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात आघाडी नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने घेतली आहे. आज (२५ ऑक्टोबर) जमशेदपूर एफसीविरुद्ध दुसऱ्या सत्रात दहा खेळाडूंनीशी खेळावे लागल्यानंतरही नॉर्थइस्टने १-१ अशी बरोबरी साधली. इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर नॉर्थइस्टने सुमारे १७ हजार प्रेक्षकांसह ही कामगिरी साकारली.
पहिल्या सत्राच्या प्रारंभी नायजेरियाच्या बार्थोलोम्यू ओगबेचे याने नॉर्थइस्टचे खाते उघडले. भरपाई वेळेत मिस्लाव कोमोर्स्कीला रेड कार्डमुळे बाहेर जावे लागले. दुसऱ्या सत्रात फारुख चौधरीने जमशेदपूरला बरोबरी साधून दिली, पण त्यानंतर गोलरक्षक पवन कुमार याच्यासह नॉर्थइस्टने जमशेदपूरला निर्णायक गोलपासून रोखताना चिवट बचाव केला.
नॉर्थइस्टची ही चार सामन्यांतील दुसरी बरोबरी असून त्यांनी दोन विजय मिळविले आहेत. त्यांचे आठ गुण झाले. त्यांनी एफसी गोवा आणि बेंगळुरू एफसी यांना (प्रत्येकी ७ गुण) मागे टाकले. जमशेदपूरचे चौथे स्थान कायम राहिले. तीन बरोबरी व एका विजयासह त्यांच्या खात्यात सहा गुण आहेत.
२०व्या मिनिटाला निखील कदमने डावीकडून रेडीम ट्लांगला पास दिला. त्यावेळी बचावासाठी सरसावलेल्या जमशेदपूरच्या मारीओ आर्क्वेसला चकवून फेडेरीको गॅलेगो याने चेंडूवर ताबा मिळविला. हा चेंडू मिळताच ओगबेचेने इतर प्रतिस्पर्ध्यांना चकवित तोल सावरत शानदार फटक्यावर गोल केला. त्याने जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल याला संधी दिली नाही.
पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत जमशेदपूरच्या कार्लोस कॅल्वो याला कोपराने धक्का दिल्यामुळे नॉर्थइस्टचा क्रोएशियन खेळाडू मिस्लाव कोमोर्स्की याला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्यात आले. एक खेळाडू कमी झाल्याचा फटका नॉर्थइस्टला बसणे अटळ होते. दुसऱ्या सत्रात चौथ्याच आणि एकूण ४९व्या मिनिटाला हे घडले. पाब्लो मॉर्गाडोने दिर्घ पास हेडिंगवर नियंत्रित केला. त्याने सोपविलेल्या चेंडूला फारुखने नेटची दिशा देताना नॉर्थइस्टचा गोलरक्षक पवन कुमार याला चकविले.
यानंतर जमशेदपूरकडून जोरदार प्रतिआक्रमण अपेक्षित होते. ५८व्या मिनिटाला कार्लोस कॅल्वोने ३० यार्डावरून फ्री किकवर मारलेला फटका पवनने अडविला. चार मिनिटांनी रेडीमने ब्लॉक केलेला चेंडू धनचंद्र सिंग याच्यापाशी पडला. बॉक्सबाहेरून धनचंद्रला फिनीशिंग मात्र करता आले नाही. ७९व्या मिनिटाला जमशेदपूरचा बदली खेळाडू मायकेल सुसैराज याने डावीकडून आगेकूच केली. पवनने वेळीच अंदाज घेत डावीकडे जात चेंडू थोपविला. रिबाऊंडवर टीम कॅहील याने प्रयत्न केला, पण त्याचा सुद्धा फटका पवनने अडविला. तोपर्यंत ऑफसाईडचा इशारा झाला होता.
अखेरच्या मिनिटाला मारीओ आर्क्वेसने फारुख चौधरीच्या पासवर फटका मारला. त्यावेळी पवनचा अंदाज चुकला होता, पण नॉर्थइस्टच्या सुदैवाने गुरविंदर सिंग याच्या अंगाला लागून चेंडू बाहेर गेला. परिणामी मिळालेल्या कॉर्नरवर काही घडले नाही.
सामन्यातील पहिला प्रयत्न तिसऱ्या मिनिटाला जमशेदपूरने केला. फारुख चौधरीने बॉक्समध्ये पाब्लो मॉर्गाडो याला क्रॉस पास दिला, पण चेंडूचा वेग जास्त असल्यामुळे पाब्लोला नियंत्रण मिळविता आले नाही. सुरवातीला जमशेदपूरने वर्चस्व राखत चेंडू नॉर्थइस्टच्या क्षेत्रात ठेवला होता, पण त्यांना भेदक चाल रचता येत नव्हती. ११व्या मिनिटाला फारुखला चेंडू हाताळल्याबद्दल पंचांनी ताकीद दिली.
नॉर्थइस्टने पहिला प्रयत्न १३व्या मिनिटाला नोंदविला. उजवीकडून मोकळीक मिळाल्याचा फायदा घेत फेडेरिको गॅलेगो याने आगेकूच केली. त्याने दिलेल्या पासवर ओगबेचेने आजूबाजूला प्रतिस्पर्धी असूनही योग्य स्थिती साधत फटका मारला, पण तो स्वैर होता. त्यानंतर काही वेळ फारसे काही उल्लेखनीय घडले नाही.
पिछाडीवर पडल्यानंतर जमशेदपूरने प्रयत्न केला. कार्लोस कॅल्वोने मारलेला फटका नॉर्थइस्टचा गोलरक्षक नवीन कुमार याला अडविता आला नाही, पण चेंडू गोलपोस्टला लागला. २८व्या मिनिटाला गॅलेगोच्या पासवर ओगबेचे याचा प्रयत्न अचुकतेअभावी अपयशी ठरला.
पुर्वार्धाच्या अंतिम टप्यात जमशेदपूरचे प्रयत्न अचूकतेअभावी फसले. त्यातच हेडिंगसाठी उडी घेताना धनचंद्र सिंग व रेडीम यांच्यात धडक झाली. नंतर रेडीमचा एक फटका सुब्रतने उजवीकडे झेपावत थोपविला.
महत्त्वाच्या बातम्या:
–‘करन ब्रदर्स’मुळे १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडली इंग्लंड संघाबाबत ही खास गोष्ट
–मुंबई पोलिसांनी अनोख्या अंदाजात केले विराट कोहलीचे कौतुक