भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील वाढत्या वादामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व चक्रावून गेले आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू जेसन होल्डर (jason holder) यानेही आता या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘एसीसी आशिया चषक 2025’ दरम्यान झालेला वाद पाहून होल्डर अत्यंत दुखी झाला होता.
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर त्याने दोन्ही संघांना एक मोठे आवाहन केले असून त्याचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ग्रेस हेडनच्या ‘गेम ऑन विथ ग्रेस’ या शोमध्ये बोलताना जेसन होल्डर म्हणाला, भारत आणि पाकिस्तानमधील हे भांडण मला अजिबात आवडत नाही, कारण हे आता केवळ क्रिकेटच्या मैदानापुरते मर्यादित राहिलेले नाही. हे खरंच खूप दुःखद आहे. हे दोन्ही संघ जागतिक क्रिकेटमधील महाशक्ती आहेत. भारताने आशिया चषक जिंकला, पण ते ट्रॉफी घेण्यासाठी गेले नाहीत, हे पाहून मला वाटले की हे आता अति होत आहे. जर आपण खेळाचे दूत (Ambassadors) असू, तर अशा गोष्टी व्हायला नकोत. आपण ‘जागतिक शांतते’बद्दल बोलतो, जग अधिक सुंदर बनवण्याबद्दल बोलतो, मग हे असे वागणे योग्य नाही.
होल्डरने पुढे म्हटले की, जर ही परिस्थिती बदलायची असेल, तर त्याचा पुढाकार प्रभावशाली लोकांनीच घ्यायला हवा. मैदानाबाहेर काय होतेय ते बाजूला ठेवूया, पण मैदानावर तरी भारत आणि पाकिस्तान एकत्र येऊ शकतात. जर त्यांनी क्रिकेटच्या मैदानात हे करून दाखवले, तर दोन्ही देश जगाला सांगू शकतील की आम्ही खेळाच्या स्तरावर एकत्र येऊ शकतो, तर दैनंदिन जीवनातही शांतता राखू शकतो. हे भांडण थांबवा, हे युद्ध थांबवा.
आशिया चषक 2025 च्या फायनलमध्ये भारताने विजय मिळवला होता, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव किंवा वादांमुळे भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याचे संदर्भ या बातमीत दिले आहेत.






