इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सलामीवीर जेसन रॉय याला जोरदार धक्का दिला आहे. इंग्लंड क्रिकेटने रॉयवर दोन सामन्यांची बंदी घातली आहे. इतकेच नाही तर २५०० युरो दंडही ठोठावला आहे. त्याच्यावर ही कारवाई खेळाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचवल्याबद्दल करण्यात आली आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England and Wales Cricket Board) मंगळवारी (२२ मार्च) ही कारवाई केली असून यामागील ठोस कारण स्पष्ट केलेले नाही. मात्र, त्यांनी सांगितले आहे की, रॉयने (Jason Roy) त्याची वागणूक क्रिकेटच्या हितासाठी योग्य नव्हते किंवा इंग्लंड क्रिकेट आणि स्वत:च्या प्रतिष्ठेला ठेच पोहचवणारे होते. त्याचबरोबर जर रॉयने त्याची वागणूक सुधारली नाही, तर त्याच्यावरील बंदी १२ महिन्यांपर्यंत वाढवली जाऊ शकतात.
इंग्लंडने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली की, ‘क्रिकेट शिस्तपालन समितीने जेसन रॉयच्या विरोधात निकाल दिला आहे. जेसनने आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत की, त्याने जे वर्तन करायला हवे होते ते केले नाही, यामुळे क्रिकेट, ईसीबी आणि स्वतःची बदनामी झाली. जेसनने इंग्लंडच्या आचारसंहितेतील ३.३ नियमाचे उल्लंघन केले आहे.’ (Jason Roy fined and given suspended two-match ban)
३१ वर्षीय रॉय इंग्लंडकडून शेवटचे जानेवारी महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिकेत खेळला आहे. आता त्याची जून महिन्यात नेदरलँडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी निवड होण्याची अपेक्षा आहे.
रॉयने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१४ मध्ये पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत ५ कसोटीत १८७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ९८ वनडेत ९ शतकांसह ३६५८ धावा केल्या आहेत. याबरोबर त्याने ५८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून १४४६ धावा केल्या आहेत.
आयपीएल २०२२ मधून घेतली माघार
येत्या २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातून रॉयने माघार घेतली आहे. खरंतर तो आयपीएलच्या या १५ व्या हंगामाच्या लिलावात सहभागी झाला होता. तसेच त्याला लिलावात गुजरात टायटन्सने २ कोटींच्या मुळ किंमतीत खरेदीही केले होते. मात्र, रॉयने नंतर बायो-बबलमध्ये सातत्याने राहिल्याने थकवा जाणवत असल्याने या आयपीएल हंगामातून माघार घेतली. त्याच्याऐवजी गुजरातने अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाजला संघात सामील केले.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ सामन्यांच्या तिकीट विक्रीला कधी होणार सुरुवात? घ्या जाणून
या ४ कारणांमुळे २००३ विश्वचषक ठरला जगातील आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ क्रिकेट विश्वचषक
मोठी बातमी! वयाच्या २५ व्या वर्षीच ऍश्ले बार्टीचा टेनिसला गुडबाय, जागतिक क्रमवारीत होती अव्वल