---Advertisement---

बुमराह सॅमसनला म्हणतोय, ‘कसोटीपण जिंकवली, आता बॅटच्या स्टिकरवर माझं नाव हवं’; Video व्हायरल

On: शनिवार, एप्रिल 2, 2022 4:27 PM
Jasprit-Bumrah-Sanju-Samson
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील (IPL 2022) नववा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होत आहे. शनिवारी (२ एप्रिल) डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या सामन्याआधी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी नेट्समध्ये चांगलाच घाम गाळला आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी सरावादरम्यान मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन मजा-मस्ती करताना दिसून आले. त्यांच्यातील मजेशीर संभाषणाचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. 

सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही संघ सराव करत असताना जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) एकमेकांना भेटले. यादरम्यान, त्यांच्यात फलंदाजीबद्दल चर्चा होत असल्याचे व्हिडिओवरून लक्षात येते. हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की, बुमराह सॅमसनशी बोलताना सांगत आहे, की त्याला त्याच्या नावाचे स्टिकर त्याच्या बॅटवर हवे आहे. म्हणजेच त्याच्या स्टिकरवर ‘जसप्रीत बुमराह’ असे नाव हवे आहे. हे सांगत असताना बुमराह असेही म्हणतो, की त्याने तर फलंदाजी करताना कसोटी सामनाही जिंकून दिला आहे.

हे सर्व बोलताना बुमराह कदाचीत लॉर्ड्स कसोटीचा संदर्भ देत असावा असा कयास लावला जात आहे. कारण २०२१ मध्ये लॉर्ड्स येथे झालेल्या कसोटीत बुमराहने नाबाद ३४ धावा करताना मोहम्मद शमीबरोबर ९ व्या विकेटसाठी नाबाद ८९ धावांची भागीदारी केली होती. तो सामना भारताने १५१ धावांनी जिंकला होता.

दरम्यान, बुमराहची इच्छा ऐकून सॅमसनही हसताना दिसत आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केले जात असून विविध प्रतिक्रियाही येत आहेत (Jasprit Bumrah and Sanju Samson Viral Video).

मुंबईसमोर राजस्थानचे आव्हान
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (Mumbai Indians vs Rajasthan Royals) यांच्यात होणारा सामना दोन्ही संघांचा हंगामातील हा प्रत्येकी दुसरा सामना आहे. मुंबईने या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना खेळला, ज्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला, तर राजस्थानने त्यांचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला. या सामन्यात राजस्थानने एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे आता मुंबईला विजयी मार्गावर परतण्याचा, तर राजस्थानला विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

दरम्यान, या सामन्यात मुंबईसाठी बुमराहची चांगली गोलंदाजी, तर राजस्थानसाठी सॅमसनच्या नेतृत्त्वाबरोबर चांगली फलंदाजी महत्त्वाची असणार आहे. यापूर्वी बुमराहसाठी दिल्लीविरुद्धचा सामना खास ठरला नव्हता. त्याला एकही विकेट या सामन्यात मिळाली नव्हती. त्याउलट सॅमसनसाठी आयपीएलची सुरुवात चांगली झाली आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करताना सामनावीर पुरस्कारही पटकावला होता. आता दुसऱ्या सामन्यात या दोघांची कामगिरी कशी होते हे पाहावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएलमध्ये ३ शतके ठोकणाऱ्या राजस्थानच्या ‘या’ फलंदाजाचा मुंबईविरुद्ध मोठा रेकॉर्ड, पूर्ण केले ‘द्विशतक’

रसलच्या तुफानी खेळीचं किंगखानकडून कौतुक! म्हणाला, ‘चेंडू एवढा उंच उडताना…’

MI vs RR: मुंबईचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय, सूर्यकुमारला संधी नाही; पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---