भारताने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात विजयाने केली आहे. या सामन्यासाठी भारताकडे संघ निवडण्यासाठी केवळ १३ खेळाडूंचे पर्याय उपलब्ध होते. जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर या सामन्यासाठी उपस्थित नव्हते. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने यूएसएच्या सामन्यानंतर सुंदरबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्याचबरोबर भारताचा आणखी एक खेळाडू आजारी पडल्याचे वृत्त समोर येत आहे.
सुंदरला साइड स्ट्रेनची दुखापत झाली होती, यामुळे तो त्याला घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून वगळत आयुष बदोनीला संघात घेतले, मात्र टी२० विश्वचषकासाठी संघ व्यवस्थापकांनी कोणाला जागा दिली नाही. सूर्यकुमारने सुंदर दिल्लीमध्ये संघासोबत जोडला जाणार आहे, अशी माहिती यूएसएविरुद्धच्या सामन्यानंतर दिली.
भारताचा या स्पर्धेतील पुढील सामना १२ फेब्रुवारीला नामिबियाशी आहे. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सूर्यकुमारने दिलेल्या अपडेटवरून सुंदर पूर्णपणे फिट असून खेळण्यास तयार असल्याचे समजते.
बुमराह ताप आल्यामुळे यूएसएविरुद्ध खेळला नव्हता. स्पर्धेची नुकतीच सुरूवात झाल्याने संघाने अधिक जोखीम न घेण्याचे ठरवले. बुमराह आता ठीक असून अभिषेक शर्मा आजारी असल्याचे कळते. यामुळे तो यूएसएविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणालाही आला नव्हता.
सुंदरच्या फिटनेसची माहिती दिल्यानंतर सूर्यकुमारने बुमराह-अभिषेकबाबतही सांगितले. तो म्हणाला, “जसप्रीतला वातावरणामुळे ताप आला होता, तर अभिषेकची तब्येतही खराब होती. आता मात्र सर्व ठीक आहे.”
भारताने युएसएविरुद्ध प्रथम फलंदाजी केली. त्यामध्ये अमेरिकेच्या गोलंदाजांनी गतविजेत्या भारताची वरची फळी उध्वस्त करत यजमान संघाची स्थिती खराब केली होती. भारताने पहिल्या ६ विकेट्स केवळ ७७ धावसंख्येवरच गमावल्या होत्या. तेव्हा सूर्यकुमारने आत्मविश्वासाने फलंदाजी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारण्यास मदत केली. त्याने ४९ चेंडूत नाबाद ८४ धावा केल्या.
सूर्यकुमारच्या खेळीमुळे भारताने २० षटकात ९ विकेट्स गमावत १६१ धावसंख्या उभारली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. यामध्ये नुकताच संघात आलेल्या सिराजने चांगले प्रदर्शने केले. त्याने ४ षटकात २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.





