सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा डाव 185 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा आहे. कर्णधार जसप्रीत बुमराहनं दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर उस्मान ख्वाजाला बाद केलं. अशाप्रकारे बुमराह पुन्हा एकदा भारताच्या मदतीसाठी धावून आला. परंतु तुम्हाला माहिती आहे का, की या मालिकेत जसप्रीत बुमराहवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. तो या बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारतासाठी वन मॅन आर्मी असल्याचं सिद्ध होत आहे.
या मालिकेत जसप्रीत बुमराहला गोलंदाजी किंवा फलंदाजीसाठी दररोज मैदानात यावं लागलं आहे. याशिवाय त्यानं आतापर्यंत एकूण 143.2 षटकं म्हणजेच तब्बल 860 चेंडू टाकले आहेत. यामध्ये या वेगवान गोलंदाजानं ऑस्ट्रेलियाच्या 31 फलंदाजांना आपला बळी बनवलं. या दरम्यान जसप्रीत बुमराहची सरासरी 12.64 आणि इकॉनॉमी 2.73 एवढी राहिली. त्याची मालिकेतील सर्वोत्तम कामगिरी 76 धावांत 6 बळी एवढी आहे.
जसप्रीत बुमराह सध्या गोलंदाज म्हणून त्याच्या करिअरच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. मात्र यामुळे त्याच्यावर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. बुमराहवरील हा कामाचा बोजा आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी यावर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये खेळली जाणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयला बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटकडे लक्ष द्यावं लागेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराह भारताचा हुकुमी एक्का असणार आहे. अशा परिस्थितीत त्याच्या फिटनेसबाबत कोणतीही हयगय टीम मॅनेजमेंटला महागात पडू शकते. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आराम मिळावा यासाठी बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विश्रांती देखील दिली जाऊ शकते. मात्र याबाबत अद्याप काहीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा –
स्कॉट बोलँडनं मोडला 50 वर्ष जुना विक्रम! अशी कामगिरी करणारा सर्वात वयस्कर गोलंदाज
रोहित शर्माला बसणार आणखी एक धक्का! कसोटी पाठोपाठ वनडेचंही कर्णधारपद जाणार?
रोहितला ड्रॉप करण्यामागे केवळ गौतम गंभीरचा हात नाही, या व्यक्तीच्या सांगण्यावरून घेण्यात आला निर्णय