सध्या इंग्लंडचा संघ भारत दौर्यावर असून उभय संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन सामने संपले असून उर्वरित दोन सामने अहमदाबादला खेळवले जाणार आहेत. तसेच या कसोटी मालिकेनंतर पाच टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका देखील खेळवली जाणार आहे.
मात्र, आता समोर येत असलेल्या वृत्तानुसार भारतीय संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे. या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा विचार भारतीय संघ व्यवस्थापन करत आहे. त्याच्यावरील अतिरिक्त ताण लक्षात घेता हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेबाबत बोलायचे झाल्यास बुमराह दोन्ही कसोटी सामने खेळणार, हे जवळपास निश्चित आहे. कारण भारतीय संघाला जून महिन्यात लॉर्ड्स येथे होणार्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने आगामी दोन सामने अतिशय महत्त्वाचे आहेत.
अशा परिस्थितीत कसोटी मालिकेनंतर बुमराहला मर्यादित षटकांच्या मालिकेतही खेळवणे, हे त्याच्यावर अतिरिक्त भार टाकणे असेल, असा मतप्रवाह आहे. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेतून त्याला विश्रांती दिल्या जाईल, अशी चर्चा आहे.
अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या हाती असेल. एका बीसीसीआय अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले की, “बुमराहने ऑस्ट्रेलियात जवळपास १५० षटके गोलंदाजी केली. तसेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही ३० ते ४० षटके गोलंदाजी केली. याशिवाय क्षेत्ररक्षक म्हणून मैदानावर पण तो बराच वेळ होता. त्यामुळे हे लक्षात घेता अहमदाबादच्या दोन कसोटी सामन्यांनंतर त्याला विश्रांती देणेच संयुक्तिक असेल.”
“तसेही आगामी पाच टी-२० सामन्यांची मालिका ही टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची शेवटची मालिका असेल. त्यामुळे उपलब्ध पर्याय चाचपून पाहण्याची देखील बीसीसीआयकडे शेवटची संधी असेल. अशा परिस्थितीत बुमराहला आराम देणे फायदेशीरच ठरेल”, असेही या बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने शेवटी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
“त्याला जाऊ देणे गरजेचे होते”, रूटने सांगितले मोईन अलीला मायदेशी पाठवण्यामागचे खरे कारण
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर आली अश्विनची प्रतिक्रिया, ‘या’ व्यक्तीला दिले शतकाचे श्रेय






