इंग्लंड क्रिकेट संघाला मंगळवारी (१६ फेब्रुवारी) भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ३१७ धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चार कसोटी सामन्यांची ही मालिका आता १-१ अशा बरोबरीत आली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अनुषंगाने इंग्लंडसाठी या मालिकेचे महत्त्व खूपच जास्त वाढले आहे. तरीही, इंग्लंडचे संघ व्यवस्थापन ‘रोटेशन पॉलिसी’ चा अवलंब करत असल्याने, त्यांच्यावर टीका होत आहे. आता, या मुद्द्यावर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने समोर येऊन स्पष्टीकरण दिले आहे.
जो रूटने दिले स्पष्टीकरण
इंग्लंड संघाला भारताविरुद्ध दुसर्या कसोटीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर, इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंनी इंग्लंड संघाच्या ‘रोटेशन पॉलिसी’ प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केले. संघावर टीका होत असलेली पाहून, कर्णधार जो रूटने याबाबतच्या अनेक गोष्टींवर आपली मते मांडली.
सामन्यानंतर पत्रकारांना सामोरे जाताना तो म्हणाला, “माझे काम येथे उपलब्ध असलेल्या खेळाडूंचे नियोजन करणे आहे. आमच्याकडे असे खेळाडू आहे जे येथे संघाला विजय मिळवून देण्यास सक्षम आहेत. खेळाडूंची निवड झाल्यानंतर त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेणे माझे काम आहे.”
मोईन अली प्रकरणावर केले भाष्य
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अखेरच्या दोन कसोटीसाठी जाहीर केलेल्या संघात मोईन अलीला स्थान दिले नाही. वैयक्तिक कारणामुळे त्याने मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. त्याविषयी बोलताना रूट म्हणाला, “आम्ही मोईनला संघाबाहेर केले नाही. त्याला घरी जाणे गरजेचे होते. त्यामुळे त्याचा संघात समावेश नसेल. त्याला बायो-बबलमधून बाहेर जाण्याची इच्छा होती आणि आम्ही त्याला रोखू शकत नव्हतो.”
श्रीलंका दौऱ्यावर पोहोचल्यानंतर मोईन अलीची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. त्यामुळे तो त्या दौऱ्यावर एकही कसोटी खेळू शकला नव्हता.
इंग्लंड संघ राबवत आहे ‘रोटेशन पॉलिसी’
कोरोना आजारामुळे इंग्लंडचा संघ सध्या ‘रोटेशन पॉलिसी’ राबवत आहे. त्याचमुळे, दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ व्यवस्थापनाने जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन व जोस बटलर या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत बेन फोक्स, ओली स्टोन व स्टुअर्ट ब्रॉड यांना संधी दिली होती. इंग्लंड संघाच्या या निर्णयावर मायकेल वॉन तसेच केविन पीटरसन यांनी नाराजी व्यक्त केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर आली अश्विनची प्रतिक्रिया, ‘या’ व्यक्तीला दिले शतकाचे श्रेय
नेटकरी जोमात, इंग्लंड कोमात! भारताच्या विजयानंतर चाहत्यांचा उत्साह, सोशल मिडीयावर मिम्सचा सुळसुळाट
अक्षर पटेलने गाजवले पदार्पण! तब्बल ४२ वर्षांनंतर ‘असा’ पराक्रम करणारा बनला दुसराच भारतीय






