भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (१६ फेब्रुवारी) संपुष्टात आला. पहिल्या सामन्यातील अनपेक्षित पराभवाच्या धक्क्यातून सावरत भारताने या सामन्यात जोरदार पुनरागमन केले. तिन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करत यजमानांनी पाहुण्या इंग्लंड संघाला ३१७ धावांनी शिकस्त दिली आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
भारताच्या या विजयात सगळ्याच खेळाडूंनी हातभार लावला. मात्र त्यातही पदार्पणवीर अक्षर पटेलने विशेष लक्ष वेधून घेतले. पहिल्या डावात २ बळी मिळवणार्या अक्षरने दुसर्या डावात ५ बळींची कमाई केली. पदार्पणातील या कामगिरीने त्याला एका खास यादीत स्थान मिळवून दिले.
पदार्पणात ५ बळी घेणारा दुसरा डावखुरा भारतीय फिरकीपटू
अक्षर पटेलने दुसऱ्या डावात घेतलेल्या पाच बळींमुळे तो भारताकडून पदार्पणातच पाच बळी घेणारा दुसरा डावखुरा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला. यापूर्वी अशी कामगिरी दिलीप दोशी यांनी केली होती. त्यांनी १९७९ साली पदार्पण करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली होती.
विशेष म्हणजे दिलीप दोशींनी देखील चेन्नईच्या मैदानावरच आपले पदार्पण केले होते. त्यांनी या सामन्यात १०३ धावा देऊन ६ गडी बाद केले होते. त्यांच्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी अक्षर पटेलने त्याच मैदानावर हा पराक्रम केला. अक्षरने इंग्लंडच्या दुसर्या डावात ६० धावा देत ५ बळी टिपले.
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास भारतीय संघाने इंग्लंडवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. तिसर्या दिवसाच्या ३ बाद ५३ धावसंख्येवरून पुढे सुरुवात केलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांना फारसा प्रतिकार करता आला नाही. भारतीय फिरकी गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे त्यांच्या डाव १६४ धावांवर संपुष्टात आला. आणि भारतीय संघाने ३१७ धावांसह दणदणीत विजय नोंदवला. सामन्यात ८ बळी आणि शतक झळकावण्याची कामगिरी करणार्या आर अश्विनला सामनावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
पराभवानंतरही रूटने असे भाष्य करत जिंकले भारतीय चाहत्यांचे मन; म्हणाला…
डोमेस्टिक क्रिकेटचा ‘बादशहा’ वसीम जाफरच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
कॉट आणि बोल्ड बाय दिशा! भारतीय क्रिकेटर जयंत यादव अडकला लग्नाच्या बेडीत






